राज्यात इंडियन मुजाहिदीनच्या कारवायांसाठी अनेक मुस्लीम युवक जिहादच्या नावाखाली उपलब्ध होत होते. परंतु आता ही जागा ‘इसिस’ने घेतली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया या दहशतवादी संघटनेकडे आता हे युवक आकर्षिले जात आहेत. गेल्या वर्षभरात याकडे आकर्षिले गेलेल्या युवकांची निश्चित संख्या उपलब्ध होऊ शकलेली नसली तरी चिंता करण्यासारखीच परिस्थिती असल्याचे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी मान्य केले. किंबहुना राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाकडून याबाबत सुरू असलेल्या गोपनीय तपासातही याला दुजोरा मिळाला आहे.
कल्याणमधील चार युवक ‘इसिस’साठी थेट इराकला गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासाला वेग आला. इसिसकडून प्रामुख्याने इंटरनेटचा वापर केला जातो. अनेक जिहादी संकेतस्थळे तसेच चॅटिंग उपलब्ध असल्याचेही उघडकीस आले. मदरसांमध्ये इंटरनेट जोडणी नसल्यामुळे तेथे युवकांना  लक्ष्य करता आले नसले तरी महाविद्यालयात अल्पसंख्याक युवकांमध्ये कमालीचे आकर्षण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने मोठय़ा प्रमाणात महाविद्यालयीन युवकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत एटीएसच्या ६५ अधिकाऱ्यांनी १५२ महाविद्यालये पालथी घातली तसेच जी ३६ जिहादी संकेतस्थळे सील करण्यात आली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पॅरिस, कॅनडा व ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांबाबत चिथावणारी माहिती असल्याचे आढळते.  
दहशतवादाने ‘इसिस’ हा नवा अवतार धारण केला आहे. अमेरिका व इराकविरोधी असे त्याचे स्वरूप असले तरी इंडियन मुजाहिदीन वा सिमीसारखे जाळे पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या त्याविरोधात आम्ही आघाडी उघडली आहे. महिन्याभरात ६१ हजार युवकांपुढे सादरीकरण करण्यात आले, त्यांना परावृत्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे राज्य ‘एटीएस’चे अतिरिक्त महासंचालक हिमांशू रॉय यांनी सांगितले.

Story img Loader