मुंबई : लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादिया शुक्रवारी खार पोलिसांकडे चौकशीसाठी उपलस्थित राहिला नाही. अलाहबादियाला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील वादग्रस्त विधानाबाबत खार पोलिसांना तक्रार प्राप्त झाली असून त्याप्रकरणी पोलीस प्राथमिक चौकशी करीत आहेत.
युट्युबर रणवीर अलाहबादिया गुरुवारी खार पोलिसांकडे चौकशीसाठी उपस्थित राहणार होता. पण तो अनुपस्थित राहिल्यामुळे खार पोलिसांनी रणवीरला शुक्रवारी पुन्हा चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्याबाबत त्याच्या वकिलांशी संपर्क साधण्यात आला होता. पण त्यानंतरही तो शुक्रवारी अनुपस्थित राहिला. याप्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक रणवीरच्या वर्सोवा येथील निवासस्थानी गेले होते. याप्रकरणी गुवाहाटी येथेही गुन्हा दाखल असून तेथील पथकही खार पोलिसांसह तेथे गेले होते. पण रणवीर घरी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अलाहबादियाने नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका भागात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात तो पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्याच्यासोबत इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स अशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते. अलाहबादियाने एका स्पर्धकाशी संभाषण करताना वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात सोशल मीडियावर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. या वादग्रस्त विधानानंतर मुंबईतील दोन वकील अशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी विधान अश्लील असून त्यामुळे महिलांचाही अपमान करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, कलाकार आणि संबंधित इतरांवर गुन्हा दाखल करावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी,” असे ॲड. राय यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सध्या पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही आणि ते याप्रकरणी चौकशी करीत आहेत. दुसरीकडे गुवाहाटी पोलीस व महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने रैना, रणवीर सह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये रणवीर उपस्थितीत असलेल्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, समय रैनाने ‘एक्स’वर पोस्ट करीत युट्युबवरील सर्व चित्रफीती हटवल्याचा दावा केला होता. तसेच सध्या तो परदेशात असल्याचेही रैनाच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आले आहे.