मुंबई : इंडियाज गॉट लेटेंटमध्ये युट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. युट्युबर समय रैना हा परदेशात असल्यामुळे आपली चौकशी दूरचित्र माध्यमातून (व्हिडिओ कॉन्फरन्सिग) करण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली आहे. त्याला ही याप्रकरणी समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.

यूट्यूबर समय रैना याने महाराष्ट्र सायबर विभागाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे जबाब नोंदवण्याची विनंती केली. सध्या तो देशाबाहेर असल्यामुळे त्याने अशी विनंती केली आहे. मात्र, महाराष्ट्र सायबर विभागाने त्याची मागणी फेटाळली असून त्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून जबाब नोंदवावा लागेल, असे सांगितले. त्याच्या जबाबासाठी त्याला १८ फेब्रुवारी रोजी कफ परेड येथील महाराष्ट्र सायबर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

अलाहबादियाने नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या एका भागात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात तो परिक्षक म्हणून उपस्थित होता. त्याच्यासह इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स अशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते.अलाहबादियाने एका स्पर्धकाशी संभाषण करताना वादग्रस्त विधान केले. त्याच्या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमावर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने रैना, रणवीरसह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या रणवीरच्या उपस्थितीत असलेल्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या सहभागाची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, समय रैनाने एक्सवर पोस्ट करून युट्युबवरील सर्व चित्रफीती हटवल्याचा दावा केला होता. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागासह गुवाहाटी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली असून मुंबई पोलीसही प्राथमिक चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनीही याप्रकरणी रणवीर व समय यांच्यासह सहाजणांना चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. तसेच महाराष्ट्र सायबर विभागानेही याप्रकरणी सुमारे ५० जणांना समन्स बजावले आहे. त्यात कार्यक्रमांच्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी परिक्षक, स्पर्धकांचा समावेश आहे.

Story img Loader