मुंबई : विविध आंतरराष्ट्रीय कला व क्रीडा उपक्रमांच्या दौऱ्यांसाठी विद्यार्थ्यांनाच पैसे खर्च करावे लागत असल्याचा दावा ठाकरे गटाच्या युवा सेनेने केलेला आहे. तसेच इटलीतील एग्रीजेंटो येथे पार पडलेल्या ७७ व्या लोकनृत्य महोत्सवाच्या दौऱ्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संघातील विद्यार्थ्यांना अर्धा खर्च करण्यास विद्यापीठानेच सांगितल्याचा आरोपही युवा सेनेने केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा सर्व खर्च मुंबई विद्यापीठाने कुलगुरू निधीतून करावा, अशी मागणी करीत युवा सेनेने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे.
भारतीय विद्यापीठे संघाच्या (एआययु) निमंत्रणावरून मुंबई विद्यापीठाच्या चमूला इटली येथील सांस्कृतिक महोत्सवात सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या महोत्सवात मुंबई विद्यापीठाने भारताचे प्रतिनिधित्व केले. ९ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत इटलीतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एग्रीजेंटो महापालिका शहरात विविध ठिकाणी ‘दिवळी’ या लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. पण या महोत्सवाच्या दौऱ्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संघातील विद्यार्थ्यांना अर्धा खर्च करण्यास विद्यापीठानेच सांगितल्याचा आरोपही युवा सेनेने केला आहे. मात्र हा दावा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने फेटाळून लावला असून विद्यार्थ्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी विद्यापीठ घेत असते, असे स्पष्ट केले आहे.
‘इटली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सवासाठीच्या संघात मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या दौऱ्याचा खर्च महाविद्यालयाने आणि विद्यार्थ्यांनी करावा, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांच्या दौऱ्यांचा खर्च गरीब विद्यार्थ्यांना पेलणे अशक्य आहे. त्यामुळे हे हुशार विद्यार्थी कलागुण असूनही स्पर्धेपासून वंचित राहू शकतात. तरी क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च विद्यापीठाच्या तत्सम विभागाने करावा. जर संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध नसेल, तर हा खर्च कुलगुरु निधीमधून करावा’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे म्हणणारे काय?
खेळ, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राअंतर्गतच्या विविध आंतरराष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्यासाठी विविध संस्थांकडून मुंबई विद्यापीठास आमंत्रित केले जाते. याप्रसंगी विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना सीएसआर प्रायोजकत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी भाग घेत असतात. तथापि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमातील सहभागासाठी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेत असते, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.