मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीवरील स्थगितीमुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या युवा सेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी अधिसभा सदस्य प्रवीण पाटकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. अधिसभा निवडणुकीवरून वाद रंगलेला असतानाच प्रवीण पाटकर यांनी पक्षांतर केल्यामुळे ठाकरे गटाच्या युवा सेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या मागील पंचवार्षिक नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत प्रवीण पाटकर हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र यंदाच्या अधिसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे पाटकर हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार, फडणवीस-पवारही उपस्थित
मुंबई विद्यापीठाच्या मागील पंचवार्षिक नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून विजयी झालेले महादेव जगताप व राखीव प्रवर्गातून विजयी झालेले निखिल जाधव तसेच राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा सदस्य वैभव थोरात यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे.