ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या आक्रोश मार्चात घोषणाबाजी करताना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या युवा सेनेच्या सचिव ॲड. दुर्गा भोसले शिंदे यांचे बुधवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ३० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, आई, वडिल केशवराव भोसले, उभा असा परिवार आहे.
महाविकास आघाडीतर्फे बुधवारी ठाण्यामध्ये आकोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये दुर्गा भोसले शिंदे कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाल्या होत्या. घोषणाबाजी करीत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी मुंबईत परत पाठवले. मुंबईत येताच त्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. मात्र रात्री ११ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. पेडर रोडमधील कंबाला हिल परिसरातील जसलोक रुग्णालयाच्या शेजारील धीरज अपार्टमेन्ट येथील निवासस्थानावरून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता त्यांची अत्ययात्रा निघणार आहे. वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.