अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी असा इशारा दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘मातोश्री’च्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून राणा दांपत्याला योग्य उत्तर देण्याची तयारी केली आहे. असं असतानाच अमरावतीमधून काही शिवसैनिकही राणा यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. याच शिवसैनिकांनी नवनीत राणा यांना रवी राणांना ‘मुझको राणाजी माफ करना’ म्हणावं लागणार असल्याचा टोला लगावलाय.

नक्की वाचा >> मुंबईत घडामोडींना वेग! मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याबरोबरच पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाची पोलीस सुरक्षा वाढवली

“इथे आम्ही राणा कुटुंबियांचा जाहीर निषेध करत आहोत. त्यांनी आम्हाला आव्हान दिलं आहे की ते मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार आहेत. एक तर त्यांनी मातोश्री पर्यंत पोहचून दाखवावं. ते मुंबईत दाखल झालेत. अमरावतीमधून निघताना संध्याकाळी पाचची वेळ द्यायची आणि सकाळीच पळून यायचं. गनिमी काव्याच्या माध्यमातून त्यांचं जे काही चाललंय त्याला शिवसैनिक भीक घालत नाही,” असं अमरावतीच्या युवासेना नेत्या गीता झगडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय.

गीता झगडेंसहीत काही शिवसैनिक अमरावतीमधून मुंबई दाखल होऊन मातोश्री समोर नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात आंदोलन करत आहेत. “मुझको राणा जी माफ करना असं नवनीत राणा रवी राणांना बोलणार आहेत. कारण शिवसैनिकांचा प्रसाद मिळता मिळत नाही पण आज त्यांना असा मिळणार आहे की ते कधी आयुष्यात विसरणार नाहीत,” असा टोला गीता झगडेंनी लगावला आहे.

“मुख्यमंत्र्यांना शक्ती मिळावी, महाविकास आघाडी आल्यापासून साडेसाती लागलीय अशी वक्तव्य स्टंटबाजी आहेत. व्हाय सुरक्षा मिळवण्यासाठी ही वक्तव्य केली जात आहेत. अमरावती त्यांना कंटाळीय. त्यामुळे स्टंटबाजी करुन महाराष्ट्रभर, देशभर प्रसिद्धी मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत,” असंही गीता झगडे म्हणाल्यात.

“बंटी आणि बबली पोहोचले असतील तर पोहोचू द्या. हे फिल्मी लोक आहेत. ही स्टंटबाजी, मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आणि भाजपाला आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत,” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दांपत्यावर टीका केलीय.