काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की, बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावरून राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ काँग्रेसमधील आणखी एका मोठ्या नेत्याने पक्षांतर केलं तर मुंबई काँग्रेसचं मोठं नुकसान होईल, असं बोललं जात आहे. सिद्दीकी पिता-पुत्रांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली असून येत्या १० फेब्रुवारी रोजी दोघेही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. यावर आमदार झिशान सिद्दीकी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं.
आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले, माझ्या वडिलांबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, मी केवळ स्वतःबद्दल बोलू शकतो. काँग्रेस सोडून कुठल्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. वडिलांबाबत मात्र मी काही बोलू शकत नाही.
बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. या भेटीनंतर दोघेही अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा चालू झाली आहे. १० फेब्रुवारी २०२४ रोजी दोघांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचा दावा केला जात आहे, या चर्चांवर स्पष्टीकरण देताना झिशान सिद्दीकी म्हणाले, नाही, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करत नाहीये. मी काँग्रेसमध्येच आहे. मी आणि माझ्या वडिलांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. त्या भेटीबाबतचं वृत्त खरं आहे. आमचं कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे आम्ही अधून-मधून भेटत असतो. परंतु, ती काही राजकीय बैठक नव्हती. मी इतर कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही.
झिशान सिद्दीकी म्हणाले, मी आणि माझे वडील राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जाणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे मला सर्वजण फोन करत आहेत. दिल्तीतूनही फोन येत आहेत. परंतु, मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, माझा कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा इरादा नाही. माझ्या वडिलांबाबत मी काही बोलू शकत नाही. त्यांच्याबद्दल काही असेल तर ते सवतः बोलतील.
हे ही वाचा >> “मुस्लिम समाजात फूट पाडण्याकरता…”, बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या शक्यतेवरून राऊतांची टीका
तुमच्या वडिलांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर तुमची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारल्यावर झिशान सिद्दीकी म्हणाले, मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहीन. परंतु, मी वडिलांबाबत भविष्यवाणी करू शकत नाही. काँग्रेस सोडून इतर कुठेही जाण्याचा माझा विचार नाही.