Zeeshan Siddique : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा ई मेल त्यांना आला आहे. मागच्या वर्षी बाबा सिद्दिकी यांची वांद्रे या ठिकाणी काही हल्लेखोरांनी हत्या केली. त्यानंतर आता झिशान सिद्दिकी यांना धमकीचा ई मेल आला आहे. बाबा सिद्दिकींप्रमाणेच तुझी अवस्था करु असं या मेलमध्ये लिहिलं आहे.

झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याची धमकी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.त्यामुळे पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांना ईमेलवरुन जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी आल्यानंतर, पोलिसांचे पथक झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. तसंच झिशान सिद्दिकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

१० कोटींच्या खंडणी मागितल्याची माहिती

झिशान सिद्दिकी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचे मेल आल्याची माहिती आहे. डी गँगचा उल्लेख करत जे हाल तुझ्या वडिलांची जी अवस्था केली तशीच तुझी अवस्था करु, अशी धमकी झिशान सिद्दिकी यांना देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून झिशान सिद्दिकींना धमकीचे मेल येत आहेत. या मेलमधून सिद्दिकी यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. प्रत्येकी सहा तासांनंतर आठवण करुन देण्यासाठी मेल पाठवणार असल्याचा उल्लेख आहे.

१२ ऑक्टोबर २०२४ ला बाबा सिद्दिकींची हत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयासमोरच शनिवार १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करत हत्या केली होती. त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयात ते जात होते. तेव्हा खेरवाडी सिग्नलजवळ बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून गोळीबार करीत त्यांची हत्या केली. आता बाबा सिद्दिकींचा मुलगा झिशान सिद्दिकींना तुझ्या वडिलांप्रमाणेच हत्या केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात झिशान सिद्दिकींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.