लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १७३ दुकानांच्या ई लिलावाची प्रक्रिया अखेर शुक्रवारी पूर्ण झाली. मंडळाने विक्रीसाठी काढलेल्या १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे आता १७३ पैकी ११२ दुकानांची विक्री होणार असून यातून मुंबई मंडळाला किमान १०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या गृहप्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकानेही बांधण्यात येतात. या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने करण्यात येते. मागील काही वर्षात मुंबई मंडळाने मुंबईतील शेकडो दुकानांची विक्री ई लिलावाद्वारे केली. मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच परवडणाऱ्या दरात दुकाने खरेदी करण्याचीही संधी ई लिलावाद्वारे म्हाडातर्फे दिली जाते. असे असताना मागील काही तीन-चार वर्षांत दुकानांची विक्रीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने दुकाने विक्रीवाचून रिक्त होती.

आणखी वाचा-आयपीएस अधिकाऱ्याची बदनामी करणे वकिलाला भोवले, वकील नवीन चोमल यांना एक महिन्याची शिक्षा

रिक्त दुकानांमुळे मुंबई मंडळाचा महसूलही बुडत होता. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीच्या आठवड्यात मुंबई मंडळाने १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. १ मार्चपासून यासाठी नोंदणी, अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात आली असून गुरुवारी मंडळाने पात्र अर्जदारांकडून दुकानांसाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार सोमावारी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत बोली लावण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई मंडळाच्या वेळापत्रकानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता विजेत्यांची नावे अर्थात निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत बोली लावण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे निकाल जाहीर होण्यासाठी काहीसा विलंब झाला असून लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-खासदार, आमदारांच्या खटल्यांचा तपशील द्या, उच्च न्यायालयाचे सर्व जिल्ह्यांच्या प्रधान न्यायाधीशांना आदेश

१०० कोटींचा महसूल

१७३ दुकानांपैकी ६१ दुकानांसाठी एकही अर्ज सादर झाला नसल्याने ही दुकाने रिक्त राहिल्याचीही माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. ११२ दुकानांसाठी बोली लागली असल्याने ही दुकाने विकली जाणार आहेत. तर प्रतिसाद न मिळालेल्या ६१ दुकानांचा पुन्हा ई लिलाव करायचा की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने ही दुकाने विकायची याबाबत मुंबई मंडळाकडून विचार सुरू आहे. मुंबई मंडळाला १७३ दुकानांच्या विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता होती. मात्र ११२ दुकानांसाठी बोली लागल्याने आता किमान १०० कोटी रुपये मुंबई मंडळाच्या तिजोरीत जमा होतील.