नागरिक मात्र उदासीनच..
दक्षिण अमेरिकेत वेगाने पसरलेल्या झिकाचा रुग्ण भारतात आढळला नसला तरी या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने डासांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. डेंग्यू पसरवणारे डासच झिका पसरवत असल्याने एडिस इजिप्ती डासांची उत्पत्तिस्थळे नष्ट करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी हे डास आढळून येत आहेत. त्यामुळे गेली पाच वर्षे सतत जनजागृती करूनही नागरिक डासांच्या उत्पत्तीबाबत उदासीन असल्याचे लक्षात आले.
मलेरिया, डेंग्यूमुळे दर वर्षी शेकडो जणांना संसर्ग आणि मृत्यू होत असतात. त्यामुळे डासांना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेकडून लाखो रुपये खर्चून जनजागृती केली जाते. मात्र सातत्याने संसर्ग होत असूनही आणि वर्षभर कमी-अधिक प्रमाणात मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण आढळत असूनही डास कमी करण्यासाठी नागरिकांकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. सध्या पालिकेकडून सुरू असलेल्या डासनाशक मोहिमेतही हेच दिसून येत आहे. पावसाळा नसल्याने स्वच्छ पाणी साठण्याची ठिकाणे मर्यादित आहेत. त्यातच उंच इमारती तसेच घरांच्या आत जाऊन डासप्रतिबंध करण्याचेही वगळण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेचे कीटकनाशक विभागातील कर्मचारी सध्या गरीब वस्त्यांमधील डास प्रतिबंधक मोहिमेवर आहेत. मात्र तिथेही ड्रम, कुंडीखालची ताटे, पक्ष्यांना पाणी देण्याची भांडी यात एडिस इजिप्तीच्या अळ्या सापडल्या आहेत. पहिल्याच दिवशी, ३० जानेवारीला ५४ ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या. त्यातील ४१ ठिकाणे ड्रममध्ये होती. मुंबईच्या गरीब वस्तीत लाखो ड्रम आहेत. त्यामुळे एडिस इजिप्तीची वाढ होण्यासाठी भरपूर वाव आहे. पाण्याची कमतरता लक्षात घेऊन पाणी साठवून ठेवले जाते. मात्र या पाण्यात डास अंडी घालणार नाहीत, यासाठी किमान कपडय़ाने तोंड घट्ट बांधायला हवे. मात्र एवढा साधा उपाय करण्याबाबतही लोक उदासीन आहेत, असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नािरग्रेकर म्हणाले.
‘झिका’ची भीती
मान्सूनमध्ये दर वर्षी मलेरिया व डेंग्यूची कमी-अधिक प्रमाणात साथ येते. मलेरिया हा आजार अॅनाफिलिस तर डेंग्यू एडिस इजिप्ती या डासांमार्फत पसरतो. त्यामुळे या डासांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेकडून मार्च, एप्रिलपासून मोहीम आखली जाते. हे दोन्ही डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे पाणी साठण्याची ठिकाणे-पाण्याच्या टाक्या, ड्रम, छपरावर ठेवलेले टायर, भांडी, रंगाचे रिकामे डबे डासप्रतिबंधक केली जातात. मात्र या वर्षी अचानक जानेवारीतच पालिकेला डासांविरोधातील मोहीम हाती घ्यावी लागली. त्याला कारणीभूत ठरला आहे तो दूर अमेरिकेत असणारा झिका विषाणू. झिका विषाणूंमुळे प्रौढांना साधा ताप येत असला तरी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास अर्भकांच्या मेंदूची वाढ खुंटते. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे भारतात झिका संसर्गाची उदाहरणे नसली तरी एडिस इजिप्ती डासांची व्याप्ती लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यास पालिकेने सुरुवात केली.