महापालिकेकडून ‘एडिस इजिप्ती’ डासांची शोधमोहीम सुरू
डेंग्यु, चिकनगुनिया या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ डास ‘झिका’ विषाणूंचे वाहक असून मुंबईत ‘झिका’ विषाणूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने ‘एडिस इजिप्ती’ डासांची विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील सुमारे २०४ घरांमध्ये आढळून आलेली ‘एडिस इजिप्ती’ डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली.
जगातील सुमारे २० देशांमध्ये ‘झिका’ विषाणूचा प्रभाव असल्याचे निदर्शनास आले असून ‘एडिस इजिप्ती’ हा डास ‘झिका’चा वाहक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पालिकेने २ लाख ३२ हजार ६६७ घरांची आणि १ लाख ९८ हजार ६४१ कंटेनर्सची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २०४ घरांमध्ये ‘एडिस इजिप्ती’ डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली. ही उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आल्याची माहिती कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.
‘झिका’ विषाणूची लागण झाल्यास संबंधित व्यक्तीला साधारणपणे दोन दिवस ताप येतो. अंगावर चट्टेही उठतात. गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात ‘झिका’ विषाणूची लागण झाल्यास बाळाचे डोके आकाराने तुलनेत कमी राहते, मेंदूचा विकास होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईमध्ये अद्याप ‘झिका’विषाणूचा प्रभाव आढळून आला नसला तरी सावधगिरीची व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘एडिस इजिप्ती’ डासांची विशेष शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.
मुंबईत ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारी या काळात ही मोहीम राबविण्यात आली. २०४ घरांमध्ये ३६७ ठिकाणी या डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली असून ती तात्काळ नष्ट करण्यात आली. ‘एडिस इजिप्ती’ डासांची स्वच्छ पाण्यात उत्पत्ती होत असल्याने दर सहा दिवसांनी घरातील सर्व पाण्याची भांडी रिकामी करुन स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करावी. तसेच घरामध्ये एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा. पाण्याचे ड्रम्स, टाक्या, घरातील शोभेचे कारंजे, मनी प्लांट, फेंग शुई बांबु प्लांट, झाडांच्या कुडय़ांखालील ताटल्या इत्यादीमधील पाणी रोज पूर्णपणे बदलावे, असे आवाहन राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

‘एडिस इजिप्ती’ डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मुंबईत जनजागृती करण्यात येत आहे. डासांची उत्पत्तीस्थाने आढळलेली घरे आणि आसपासच्या परिसरात डास निर्मूलनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.
– राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक खात्याचे प्रमुख

Story img Loader