एकेकाळची ग्लॅमरस अभिनेत्री झीनत अमान या वयात विवाह करते आहे म्हटल्यावर सगळीकडे तिच्या आयुष्यात आलेला हा नवा सहचर कोण हे शोधण्याची मोहीम सुरू झाली. त्यातून शिवसेनेचा सदस्य असलेल्या सरफराज अशन अहमद याचे नाव पुढे आले. मात्र, प्रसिद्धी माध्यमांनी लावलेला जावईशोध खरा नाही, असा खुलासा झीनत अमानने केला आहे. माझ्या आयुष्यात कोणी तरी आहे, हे खरे; पण मी त्याच्याशी विवाह करणार वगैरे सगळ्या गोष्टी खोटय़ा असून तो माणूस सरफराज नाही, असे झीनतने स्पष्ट केले आहे.
‘सरफराजला मी आधीपासून ओळखते. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने आमची भेट झाली आहे, पण ज्याच्याशी माझे नाते जुळले तो सरफराज नाही. प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या अशा बातम्यांमुळे माझी जशी कुचंबणा झाली तशीच अवस्था सरफराज आणि कुटुंबीयांचीही झाली असेल,’ याबद्दल झीनतने खेद व्यक्त केला आहे. प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हटले याचा अर्थ विवाहच करणार असा होत नाही, असे सांगून झीनतने आपल्या या नव्या जोडीदाराबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला.
माझ्यासाठी माझी दोन्ही मुले सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत. त्यांचा विचार प्राधान्याने माझ्या मनात येतो. बाकीच्या गोष्टी नंतर, असे म्हणत या विषयावर आपल्याला काहीही बोलायचे नाही, असेही झीनतने स्पष्ट केले. उगाचच काही तरी माहिती शोधण्याच्या नावाखाली कोणाशी तरी माझा बादरायण संबंध जोडायचा आणि खोटे तपशील द्यायचे, हे आपल्याला पटणारे नाही. आणखी काहीही माहिती मी देणार नाही, असा संताप झीनतने व्यक्त केला आहे.

Story img Loader