मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वेक्षण, खासगी व्यक्ती, विकासक वा इतर कोणत्याही संस्थांकडून करण्यात येत नसून ते झोपु प्राधिकरणाकडून करण्यात येत असल्याचे सप्ष्टीकरण झोपु प्राधिकरणाने एका जाहीर निवेदनाद्वारे केले आहे. तर मुंबई क्षेत्रातील कोळीवाडे आणि गावठाणांमध्ये झोपु प्राधिकरणाकडून कोणतेही बायोमेट्रीक सर्वेक्षण केले जाणार नाही, असेही प्राधिकरणाने या जाहीर निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान, झोपडीधारकांचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला झोपडीधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन झोपु प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

झोपडपट्टीमुक्त मुंबईचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने झोपु योजनांना गती देण्याचा निर्णय झोपु प्राधिकरणाने घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे बनावट कागदपत्रांद्वारे झोपु योजनेतील घरे लाटली जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे झोपुच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि अतिजलद करण्यासाठी झोपु प्राधिकरणाने बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार २०१६ पासून बायोमेट्रीक सर्वक्षणाला सुरुवात करण्यात आली. तीन संस्थांच्या माध्यमातून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. २०२१ मध्ये जुन्या संस्थांच्या जागी नवीन तीन संस्थांची नियुक्ती करून बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले. मात्र या सर्वेक्षणाचा वेग अत्यंत संथ असल्याने २०१६ ते जानेवारी २०२५ दरम्यान १३ लाख ८९ हजार ०८६ पैकी केवळ पाच लाख ४४ हजार ६३५ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. हे प्रमाण खूपच कमी असून अजूनही आठ लाख ३४ हजार ५५१ झोपडीधारकांचे सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे आता या सर्वेक्षणाला वेग देत ३१ मार्चपर्यंत आठ लाख ३४ हजार ५५१ झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे झोपु प्राधिकरणाचे नियोजन आहे. यासाठी मनुष्यबळासह सर्वेक्षण पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

झोपु प्राधिकरणाच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणास काही ठिकाणी झोपडीधारकांनी विरोध केला असून या बायोमेट्रिक सर्वेक्षणाबाबत अनेकांना संभ्रम आहे. या बाबी लक्षात घेत शनिवारी वृत्तपत्रांमधून एक जाहिर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनानुसार मुंबई क्षेत्रातील कोळीवाडे आणि गावठाणांमध्ये झोपु प्राधिकरणांकडून कोणत्याही प्रकारचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. झोपु योजनेत कोळीवाडे, गावठाण येत नसल्याने त्यांच्या सर्वेक्षणाचा प्रश्नच उद््भवत नाही. त्यामुळे यासंबंधीचे स्पष्टीकरण जाहीर निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. झोपडपट्यांमध्ये सुरू असलेले बायोमेट्रीक सर्वेक्षण राज्य सरकारच्या झोपु प्राधिकरणाकडून सुरू आहे. कोणतीही खासगी व्यक्ती, विकासक वा इतर कोणत्याही खासगी संस्थेकडून हे सर्वेक्षण सुरू नाही,  असे स्पष्टीकरण झोपडीधारकांचा संभ्रम दूर करण्यासाठी करण्यात आले आहे.

Story img Loader