ऑक्टोबरपासून एक कोटी मात्रांचे उत्पादन; कंपनीकडून स्पष्ट
मुंबई : झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव्ह डी’ लशीला मान्यता मिळाली असली तरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही लस बाजारात उपलब्ध केली जाईल, अशी माहिती झायडस समूहाने शनिवारी आयोजित केलेल्या वेबसंवादात दिली. त्यामुळे मुलांच्या लसीकरणासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.
लशीला केंद्रीय आरोग्य विभागाने मान्यता दिल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ४५ दिवसांमध्ये सुमारे ३० ते ४० लाख मात्रांचे उत्पादन केले जाईल. ऑक्टोबरपासून सुमारे एक कोटी मात्रांचे उत्पादन करण्यात येणार आहे. जानेवारीअखेरपर्यंत सुमारे चार ते पाच कोटी मात्रांचा साठा उपलब्ध असेल. लशीचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतातील आणखी काही कंपन्यांसोबत बोलणी सुरू असून परदेशातील काही कंपन्याही यासाठी तयार आहेत. भारतात लस वितरण साखळी निर्माण करणे, कोविनमध्ये जोडून घेणे यावर सध्या भर देण्यात येत आहे, असे झायडस समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. शार्विल पटेल यांनी सांगितले.
कच्च्या मालाचा पुरेसा साठा
लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक साठा उपलब्ध करताना सुरुवातीला काही अडचणी आल्या; परंतु आता पुढील सहा महिने पुरेल इतका साठा आयात करून ठेवलेला आहे. त्यामुळे कच्च्या मालाची कमतरता भासणार नाही, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांची मागणी
लस बाजारात उपलब्ध होण्याआधीच अनेक खासगी कंपन्यांनी (रुग्णालय साखळ्या) झायडसकडे लस खरेदीसाठी प्रस्ताव दिले आहेत. परंतु अद्याप लशीची किंमत, केंद्र सरकारची लशीची मागणी या बाबी स्पष्ट झाल्याशिवाय खासगी कंपन्यांना किती साठा द्यावा याबाबत निर्णय झालेला नाही, येत्या पाच ते सहा दिवसांत याबाबत निर्णय होईल, असे झायडसने स्पष्ट केले.
तिसऱ्या टप्प्यासाठी सहा महिने…
लस चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे अंतरिम विश्लेषण सादर केले असून यात ६६ टक्के परिणामकता दिसून आली आहे. या चाचण्यांमध्ये एकालाही घातक दुष्परिणाम आढळलेले नाहीत. मात्र तिसऱ्या टप्प्याचा अभ्यास पूर्णपणे हाती येण्यास चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.
५०० कोटींची तरतूद
लशीच्या निर्मितीसह संशोधनासाठी आत्तापर्यंत समूहाने सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील काळात आणखी निधीची गरज लागेल, असे झायडसने या वेळी नमूद केले.
डेल्टावर परिणामकारक…
भारतात सर्वाधिक आढळणाऱ्या डेल्टा विषाणूच्या काळात लशीच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे ही लस करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारांवर परिणामकारक असल्याचा दावा झायडसने केला आहे.
आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या लशींमुळे संसर्गाची तीव्रता कमी होण्यास मदत झाली.
यापुढील संशोधनही सुरू असून पुढील टप्प्यात संसर्ग होऊ नये अशी डीएनएआधारित लस तयार केली जाणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
भीती घालविण्यास उपयुक्त… ही लस इंजेक्शनविरहित असून पेनसारख्या यंत्रातून दाब देऊन दिली जाणार आहे. तेव्हा इंजेक्शनमुळे असलेली लशीची भीती घालविण्यासाठी ही लस उपयुक्त आहे, असे मत डॉ. पटेल यांनी व्यक्त केले.