मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री प्रमुख पाहुणे
१४ ऑक्टोबर १९५६ ला विजया दशमीच्या दिवशी ज्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली त्या जागेवर नतमस्तक होऊन त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी वर्षभर ज्या सोहळ्याची देशविदेशातील बौद्ध बांधव वाट पाहतात तो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन सोहळा उद्या गुरुवारी येथील दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे आयोजित सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम सांयकाळी ६ वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई राहतील.
दीक्षाभूमीवर साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा यंदाचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा आहे. यासाठी दीक्षाभूमी परिसर सज्ज झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर रोषणाई करण्यात आली आहे. परिसर निळ्या झेंडय़ांनी फुलून गेला आहे. हजारो बौद्धबांधव नागपुरात दाखल झाले असून दोन दिवसांपासून दीक्षाभूमी गर्दीने फुलून गेली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध भागातून नागरिक येत आहेत. रेल्वेने विशेष गाडय़ांची व्यवस्था केली आहे. त्याच प्रमाणे शहरातील विविध भागातून लोकांना येता यावे म्हणून शहर बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
डॉ. आंबेडकर स्मारक साकारण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनानंतर होणारा हा पहिलाच सोहळा असून ज्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे ते देवेंद्र फडणवीस यंदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री एच. अंजय्या, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, काँग्रेस नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे व महापौर प्रवीण दटके यांच्यासह थायलंड येथील ३८ प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.