राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

‘पुरावे नसताना खलनायक ठरवले!’

११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.

‘देशमुख प्रकरणातील तपासात राज्य सरकारचा असहकार’ 

काय आहेत आरोप

अनिल देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता किंवा खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती. तसंच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

गृहमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात अडकल्यानंतर अनिल देशमुख यांनी ५ एप्रिल रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

‘पुरावे नसताना खलनायक ठरवले!’

भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात काहीही पुरावे नसताना आपल्याला खलनायक ठरवण्यात येत आहे, असा दावा केला होता. आपल्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपाने संपूर्ण पोलीस दल अस्वस्थ झाल्याचा दावाही देशमुख यांच्या वतीने करण्यात आला होता.

 

Story img Loader