पोलिसांचा तरुणीला संतापजनक सल्ला
सांगलीतील कोठडीमृत्यूने पोलीस खात्याची आणि राज्याच्या गृहखात्याची प्रतिमा डागाळली असतानाच आता उपराजधानी नागपूरमध्ये, ‘बलात्कार झाल्यानंतरच तक्रार द्यायला या,’ असे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने एका तरुणीला सांगितल्याने संतापाची लाट पसरली आहे. एका तरुणीने आपल्या अतिक्रमणांवर गदा आणल्याने संतापलेल्या व्यक्तीने अमिता रामकिशोर जयस्वाल या तरुणीला बलात्काराची धमकी दिली. त्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या अमिताला हा धक्कादायक अनुभव आला, जुना सक्करदरा या भागात ती कुटुंबासह एका झोपडपट्टीत राहाते. तिच्या झोपडीपुढे रुपेश ईश्वर फुलझेले आणि किशोर फुलझेले यांचे घर आहे. फुलझेले कुटुंबियांकडून या झोपडय़ा हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून हे रहिवासी आणि फुलझेले यांच्यात नेहमीच वादंग होतात. त्यावरून वर्षभरापूर्वी अमिताने पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र नेहमीच्या वादंगांना त्रासलेल्या अमिताने माहिती अधिकारात अर्ज करून फुलझेले यांच्या घराच्या अतिक्रमणाची माहिती जमवली. महापालिकेकडे तिने पुराव्यानिशी तक्रार केल्यावर दोन दिवसांपूर्वी हे अतिक्रमण पाडले गेले. त्यामुळे संतापलेल्या किशोर फुलझेले यांनी अमिताच्या कुटुंबियांना शिविगाळ केली आणि अमिताला बलात्काराची धमकी दिली.
याबाबत अमिताने पोलीस उपायुक्तांना माहिती दिली. त्यानंतर ती भावासोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदीपन पवार यांनी ‘धमकीची नको, घटना घडल्यावर तक्रार दे’ असे उत्तर देत त्यांना परत पाठवले. त्यानंतर दोघाही भावंडांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेतली.
पोलीस सौजन्याने कधी वागणार?
पोलीस ठाणे हे सामान्य नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी आहेत. मात्र, तेथे तक्रार दाखल करायला येणाऱ्यांशी असभ्य वर्तन तर गुन्हेगारांना चांगली वागणूक दिली जाते. पोलीस सामान्यांशी सौजन्याने कधी वागणार, असा प्रश्न अमिताने केला आहे.
या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करून त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच तरुणीच्या तक्रारीवरून शिविगाळ करणाऱ्याविरुद्ध व धमकी देणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. -एस. चैतन्य,पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४.