नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या १५ दिवसात शहरावर नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा. मोमीनपुरा अन्य प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर कुणीही यायला नको किंवा बाहेरची व्यक्ती आत जायला नको. ती मग कुणीही असो. कुठल्याही पदावरील असो. जर ती पोलिसांशी वाद घालत असेल तर त्याची रवानगी थेट विलगीकरण कक्षात करा, असेही स्पष्ट निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

गेल्या दोन दिवसांत शहरात दोन दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त आणि निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली.  जर नागरिकांनी ऐकले नाही तर कठोर पावले उचलावे लागतील आणि अधिकाऱ्यांनी कुचराई केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा मुंढे यांनी दिला.

मोमीनपुरात शनिवार ९ मे पासून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने केवळ सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. सतरंजीपुरामध्ये रुग्ण आढळल्यानंतर ते प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून निर्बंध कडक केले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात पाठवले. यामुळे आज तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र दोन दिवसांत रुग्णसंख्येने शतक पार केले. यातील बहुतांश रुग्ण मोमीनपुरा परिसरातील आहे.

..तर संपूर्ण शहरात संचारबंदी

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नागरिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण शुक्रवारी घडले, हे वाईट आहे. स्वत: बिनधास्त बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी असा प्रकार करणे दुर्दैवी आहे. अशा लोकांची गय न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. नागरिकांनी आताही ऐकले नाही तर संपूर्ण शहरात संचारबंदी करावी लागेल, असा इशारा मुंढे यांनी दिला.

Story img Loader