नागपूर विभागाची प्राथमिक फेरी आजपासून
थोडेसे दडपण, पण तेवढीच उत्सुकता.. पहिल्या वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षीदेखील लोकांकिका स्पध्रेचा उत्साह तेवढाच द्विगुणित झाला आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने लोकसत्ता लोकांकिका राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेच्या नागपूर विभागाची प्राथमिक फेरी गुरुवारी सुरू होणार आहे. नागपूर विभागातून एकूण २९ महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून २२६ महाविद्यालयीन तरुण स्पर्धेत आपली कला सादर करतील. या विभागात १ ते ३ ऑक्टोबर अशी तीन दिवस प्राथमिक फेरी रंगणार आहे.
राज्यभरात लोकांकिकाचा नाटय़जागर २९ सप्टेंबरपासून सुरू झाला असून ६ ऑक्टोबपर्यंत राज्यभरातील आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी रंगणार आहे. त्यानंतर ६ ते १३ ऑक्टोबरदरम्यान या केंद्रावरील विभागीय अंतिम फेरी आणि १७ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्राची लोकांकिका निवडली जाणार आहे.
अस्तित्व या संस्थेच्या मदतीने राज्यभरात होणाऱ्या या स्पध्रेसाठी टॅलेंट पार्टनर म्हणून आयरिस प्रॉडक्शन आणि नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल यांची साथ लाभली आहे. रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम सांभाळणार आहेत.

Story img Loader