महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला बहर आणणाऱ्या लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत तरुणाईच्या आनंदाला उधाण तर आले, सोबतच अप्रतीम, स्तुत्य उपक्रम असल्याची भावनाही व्यक्त करीत असतानाच सन्मान आणि आदरातिथ्याने भारवल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या.

लोकसत्ताच्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची नागपूर विभागीय प्राथमिक फेरी दोन दिवस चालणार असून आज केवळ नागपूरबाहेरच्या विद्यार्थ्यांना पाचारण करण्यात आले होते. अमरावती, अकोला, वर्धा येथून विद्यार्थी आले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विचारांची चौफेर उधळण करून आम्हीही वाचतो, जगाचा विचार करतो, सामाजिक भान ठेवतो आणि त्यावर व्यक्तही होत असल्याचे दाखवून दिले. अंगात कापरे भरवणाऱ्या थंडीतही विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने स्पर्धेत हजेरी लावली. वक्तृत्वासाठी ठरवण्यात आलेल्या ‘धर्म आणि दहशतवाद!, इतिहास वर्तमानातला.., यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?, बीईंग ‘सेल्फी’श आणि मला कळलेली नमो नीती!’ या पाच विषयांपैकी धर्म आणि दहशतवाद आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते? या विषयांवर विद्यार्थ्यांच्या उडय़ा पडल्या.
स्पर्धेच्या उद्घाटनपर भाषणात अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी वक्तृत्वामुळे विद्यार्थ्यांंचे व्यक्तिमत्त्व उत्तरोत्तर बहर जाते, अशी मांडणी करून लोकसत्ताच्या उपक्रमाची स्तुती केली. यावेळी विदर्भ आवृत्तीचे ब्युरो चिफ देवेंद्र गावंडे आणि वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे, परीक्षक अनंत ढोले आणि डॉ. संध्या पवार उपस्थित होते.
‘जनता सहकारी बँक पुणे’ व ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या स्पर्धेची पहिली फेरी अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळच्या, विनोबा विचार केंद्रात सुरू झाली. स्पर्धेस सिंहगड इन्स्टिटय़ुट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑईल, इन्स्टिटय़ुट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अर्थात, आयसीडी यांचे सहकार्य लाभले. तसेच युनिक अ‍ॅकेडमी आणि स्टडी सर्कल स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.

‘कोणतेच शुल्क व अट नसल्याने बिनधास्त’
यावेळी अमरावतीची ऐश्वर्या चुनाडे म्हणाली, अनेक फ्रेशर्सला बोलण्याची इच्छा असते. ती इच्छा ‘लोकसत्ता’ने पूर्ण केली. शिवाय, यासाठी कुठलेच शुल्क नसल्याने गरीब विद्यार्थ्यांची खूपच सोय झाली. सर्वाना समान संधी देण्यात आली असून आधी कुठल्या तरी स्पर्धेत विजेते असल्याची अट नसल्याने आम्ही बिनधास्त होतो, तर वध्र्याच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयाचा अमित मुडे म्हणाला, मागील पिढीतील वक्ते घडवण्यात वक्तृत्व कलेचा मोठा हात आहे. त्यांचे पाईक होण्याची परंपरा निर्माण व्हावी म्हणून ‘लोकसत्ता’ने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. यातून चांगले वक्ते घडवण्यास संधी मिळते.

उद्याचे नेतृत्व यातून विकसित होणार
युथ एम्पॉवरमेंट आणि स्किल बेस’ शिक्षणावर बोलले जात असताना युवकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला लोकसत्ताने चांगले व्यासपीठ मिळवून दिले. बाकी ठिकाणी आम्ही बोलतो तेव्हा बक्षीस हे लक्ष्य असते. मात्र, युवकांमधून उद्याचे नेतृत्व विकसित करण्याची क्षमता ‘लोकसत्ता’च्या या स्पर्धेत आहे.
– अनिकेत गादेवार, शिवाजी विज्ञान महाविद्यालय

महिलांच्या समस्यांवर बोलण्याची संधी
बाहेर आपण महिलांच्या प्रश्नांवर एवढे बोलू शकत नाही. मात्र, ‘लोकसत्ता’ने या विषयाला महत्त्व देऊन महिलांच्या विविध समस्यांवर बोलण्याची संधी दिली. मधेमधे योग्य सूचना आणि आम्हाला दिलेले महत्त्व आवडले.
– प्राप्ती भोरे, विद्याभारती महाविद्यालय

छान आयोजन
आम्ही स्पर्धेला जातो तेव्हा दुसऱ्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो, पण येथे त्याची गरज पडली नाही. उलट, आपल्याला आपले मत मनसोक्त, बिनधास्त मांडण्याची मुभा मिळाली. शिक्षकांचे दडपणही या ठिकाणी नव्हते. लोकसत्ताचे आयोजन छान होते. सर्वजण आस्थेने विचारपूस करीत होते.
– घन:श्याम बरडे, केशरबाई लाहोटी महाविद्यालय

विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगले
मुलांना अशाप्रकारचे व्यासपीठ उपलब्ध नाही. ते खूप बोलतात, पण कट्टय़ावर बोलतात. मात्र, जेव्हा अशा स्पर्धेत बोलायचे असते तेव्हा तयारी लागते. धाडस, वाचन, अभ्यास करावा लागतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून पुरेपूर अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी घेतली. ‘धर्माला न मानणारे कम्युनिस्ट असतात’, असे चुकीचे सुद्धा ते आत्मविश्वासाने बोलत होते. खरे तर, लोकसत्ताने केवळ एकालाच नव्हे, तर दोन-तीन वक्ते निवडायला पाहिजे. जेणेकरून मुंबईपर्यंत जाण्याचा त्यांना व्यापक अनुभव मिळेल. स्पर्धेची तयारी लोकसत्ताबरोबरच विद्यार्थ्यांनी चांगली केली आहे.
– अनंत ढोले, परीक्षक

विद्यार्थ्यांचा सन्मान केला
विद्यार्थ्यांचा फारच सन्मान करण्यात आला. जनरली अशा स्पर्धामध्ये आमच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाहीत, पण मुलांना या, बसा, चहा, नास्त्याची सोय केली. शिवाय, आमचा बसमधून उतरण्याचा थांबाही जवळ असल्याने ऑटोचे पैसे वाचले. महाविद्यालयात असते तसे दडपण येथे नव्हते.
– पल्लवी कांडलकर, केशरबाई लाहोटी महाविद्यालय

विषय छानच
वक्ता दशसहस्रेषु’ हे छान व्यासपीठ असून त्यातून चांगले वक्ते निर्माण करणे हा हेतू असावा. ही स्पर्धा मराठीतूनच असल्याने फारच आवडले. मराठीचा अभिमान आहे. विषय छान होते आणि आयोजनही चांगले.
– मधुरा देशमुख,, विद्याभारती महाविद्यालय

सामाजिक भान जागवणारा उपक्रम
वक्ता दशसहस्रेषु’ ही वक्तृत्व स्पर्धा स्तुत्य उपक्रम आहेच आणि ती काळाचीही गरज आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्ही या तांत्रिक गोष्टींपासून दूर नेऊन त्यांच्यात सामाजिक भान जागृत करणारी ही स्पर्धा आहे. विद्यार्थी कसेही व्यक्त होत नाहीत, तर विचार करून ते बोलतात. आजची पिढी वाया गेल्याचे आपण म्हणतो, पण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास दिसतो.
– डॉ. संध्या पवार, परीक्षक

Story img Loader