नवीन रुग्ण आढळल्याने महापालिकेची कारवाई
नागपूर : शहरातील विविध भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुरुवारी महापालिकेने तीन झोनमध्ये तीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आज शुक्रवारीही धरमपेठ झोनअंतर्गत पांढराबोडी, हनुमानगर झोनअंतर्गत काशीनगर व धंतोली झोनअंतर्गत जयभीमनगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले.
शुक्रवारी पार्वतीनगरला लागून असलेल्या जयभीमनगर व काशीनगर या भागातूनही करोनाग्रस्त समोर आले. याशिवाय पांढराबोडी या परिसरात एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे परिसर बंद करण्यात आला आहे. याशिवाय मंगळवारी झोनअंतर्गत गौतम नगर प्रभाग क्रमांक १० चा परिसरही बंद करण्यात आला आहे. या सर्व भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीस मुभा आहे. मात्र, टाळेबंदीच्या काळात अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये गौतम नगर गिट्टीखदान पोलीस ठाणे, पारसी सिमेंटरी एंट्री पॉईंट, पारसी सिमेंटरी साऊथ पॉईंट, ताज किराणा, निर्मला गंगा कॉम्पलेक्स, गिट्टीखदान चौक काटोल रोड, वेल्कीन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, कॅप्स रिजेन्सी, रामदेव बाबा टेम्पल हा भाग बंद करण्यात आला आहे.
भीमनगर व द्वारकापुरी या परिसरातील ३० तर पांढराबोडी परिसरातील १६ लोकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले आहे.
पुन्हा चार करोनाबाधितांची नोंद
गुरुवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या तपासणी अहवालात तीन तर शुक्रवारी दिवसभरात एक असे एकूण चार करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे नागपुरात करोनाबाधितांची संख्या २६९ झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात रामेश्वरी भागातील आणखी दोन रुग्ण आढळले असून त्यापैकी एक जयभीमनगर येथील असून तो पार्वतीनगर येथील दगावलेल्या करोनाबाधिताचा मित्र आहे. काशीनगर येथील रुग्ण कोणाच्या संपर्कातील आहे याचा तपास सुरू आहे. या दोन्ही रुग्णांनी स्वत: मेडिकलमध्ये जाऊन करोनाची चाचणी केली असता दोघांचाही अहवाल सकारात्मक आला. पांढराबोडी या नव्या भागातही आता करोनाने शिरकाव केला आहे. येथे देखील एक रुग्ण आढळला आहे. पार्वतीनगर येथील दगावलेल्या रुग्णाच्या थेट संपर्कातील सुमारे ३० जणांचे नमुने नकारात्मक आले आहेत. विलगीकरण कक्षातील अणखी काही संशयितांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. नागपुरात आतापर्यंत ६८ करोनाबाधित बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
२० बसद्वारे ५३५ स्थलांतरित रवाना
स्थलांतरित मजुरांना स्वगावी परत पाठवण्याचा खर्च उचलण्यावरून सध्या केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वादविवाद सुरू आहे. मध्यप्रदेश सरकारने मात्र जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तुम्ही आमची माणसे पाठवण्याची व्यवस्था करा आम्ही खर्च देऊ असे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून २० खासगी बसेसद्वारे सुमारे ५३५ स्थलांतरितांना मध्यप्रदेशमध्ये पाठवण्यात आले. सीमावर्ती नाक्यांवर या मजुरांची मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढली होती. जिल्हा प्रशासनाने मध्यप्रदेश सरकारशी संपर्क साधून मजुरांना खासगी बसेसद्वारे पाठवण्याची व्यवस्था केली. मध्यप्रदेश सरकारने यासाठी येणारा खर्च देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्य़ात अडकलेल्या एकूण ५३५ स्थलांतरितांना वीस बसेसद्वारे मध्यप्रदेशमध्ये रवाना करण्यात आले. यात जबलपूरचे ५६, बालाघाटचे ८९, छिंदवाडाचे ७२, सिवनीचे १६७ बैतूलचे ४३, दातिया १३, मांडला २८, सतना १५, सिद्धी २१, रिवा येथील ३१ नागरिकांचा समावेश होता.