करोनाच्या संकट काळात दंदे रुग्णालयाचे औदार्य
नागपूर : टाळेबंदीत अनेक खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे तर दूरच, पण रुग्णालयाला चक्क टाळे ठोकले आहे. काहींनी रुग्णालय सुरू ठेवले, पण कर्मचाऱ्यांची कपात केली तर काहींनी कर्मचाऱ्यांचे वेतनच कापून टाकले. करोनाच्या संकटात अशी माणुसकीच हद्दपार होत असताना दंदे रुग्णालयाने मात्र औदार्याचे एक नवे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. रविनगर येथील दंदे रुग्णालयाचे संचालक डॉ. पिनाक दंदे यांनी आपल्या रुग्णालयातील कर्मचारी वर्गाला दीडपट वेतन आणि वाणसामान देऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली आहे.
टाळेबंदीत अनेक खासगी डॉक्टरांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर रुग्णांचाही विचार न करता रुग्णालये बंद के ली. रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका, परिचारक, सफाई कामगार हे आठ ते दहा हजार रुपयांच्या वेतनावर काम करतात. त्यातून त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह होतो. मात्र, रुग्णालयालाच टाळे ठोकल्याने गेल्या एक-दीड महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. काही रुग्णालयात त्यांचे पगार अध्र्यावर आले आहेत. शहरातील अनेक खासगी रुग्णालयात ही परिस्थिती असताना डॉ. पिनाक दंदे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.
रुग्णालयात दोन प्रकारचा कर्मचारी वर्ग आहे. त्यापैकी परिचारिका, परिचारक, स्वच्छता कर्मचारी यांच्यावर टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. यातील अनेकांच्या कु टुंबात चार ते पाच सदस्य आहेत. त्यातील किमान तीन व्यक्ती तरी कमावते आहेत, पण टाळेबंदीमुळे त्यांचा रोजगार हिरावल्याने रुग्णालयातील या एका कर्मचाऱ्यावर संपूर्ण कु टुंबाचा भार आला आहे. ज्या कु टुंबात महिन्याला किमान ३० हजार रुपयांची आवक होती, ती आता आठ ते दहा हजार रुपयांवर आली आहे. एवढय़ा कमी पैशात संपूर्ण कु टुंबाचा उदरनिर्वाह होणे शक्यच नाही. कर्मचारी बोलून दाखवत नसले तरीही ही व्यथा डॉ. दंदे यांनी जाणली. इतर ठिकाणी वेतन कपात के ली जात असताना, काही ठिकाणी अग्रीम स्वरूपात रक्कम दिली जात असताना असे काहीही न करता या कर्मचाऱ्यांना दीडपट वेतन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एवढेच नाही तर या कर्मचाऱ्यांच्या कु टुंबासाठी त्यांनी वाणसामानाची व्यवस्था केली.
जोपर्यंत व्यवस्था सुरळीत येत नाही तोपर्यंत दीडपट वेतन आणि वाणसामानाची व्यवस्था सुरूच राहणार आहे. व्यवस्था सुरळीत झाल्यानंतरही त्यातून कोणतीही कपात के ली जाणार नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असताना या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाहनाने रुग्णालयात जाणेयेणे परवडणारे नाही. वाहने नादुरुस्त झाली तर त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न उभा राहणार आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना ने-आण करण्याची व्यवस्था त्यांनी केली. डॉ. पिनाक दंदे यांनी यांच्या या उदार भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
खूप मोलाची मदत
दंदे रुग्णालयाचे प्रशासन नेहमीच कर्मचाऱ्यांची काळजी घेत असते. विशेषकरून डॉ. पिनाक दंदे नेहमीच कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मदत करत असतात. टाळेबंदीच्या काळातही त्यांनी आम्हाला नेहमीच्या वेतनाव्यतिरिक्त दीडपट वेतन देण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर वाणसामानाची व्यवस्थाही के ली. आमच्यासाठी ही खूप मोलाची मदत झाली असून आम्ही सर्व कर्मचारी वर्ग त्यांचे ऋणी राहू, अशी भावना रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने व्यक्त के ली.
हे आमचे कर्तव्यच
महिन्याच्या मिळकतीवर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. तुटपुंज्या वेतनामुळे संकटकाळात कामी येईल अशी त्यांची शिल्लक देखील नसते. अनेकांवर कर्जाचा भार आहे. अनेकांच्या कुटुंबात कमावणारे इतर सदस्य टाळेबंदीमुळे घरी बसले आहेत. ते रुग्णालयातील कर्मचारी असले तरीही त्यांची जबाबदारी आमची आहे. ते आमच्या कु टुंबातील सदस्य आहेत आणि अशा संकटकाळात
कुटुंबातील सदस्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्यच आहे.
– डॉ. पिनाक दंदे, संचालक, दंदे रुग्णालय.