टाळेबंदीमुळे राज्यातील विविध शहरात अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी १० हजार एसटी बस सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी एसटी मोफत सेवा देणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्यांना आणण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत कार्यवाही करण्यात येईल. संबंधितांची तपासणी, गरज पडल्यास करोनाची लक्षणे आढळून आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. येत्या चार-पाच दिवसांत मुंबई, पुणे किंवा इतर जिल्ह्य़ांमध्ये अडकलेले विद्यार्थी, नातेवाईकांकडे गेलेले लोक, मजूर या सर्वाना त्यांच्या गावापर्यंत मोफत पोहचवण्यात येईल. त्यांना प्रवासखर्चाचा कुठलाही भुर्दंड पडणार नाही, अशी भूमिका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
सॅनिटायझर वापरल्यावरच प्रवेश
टाळेबंदीत नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना शासनाकडून काही अटी व शर्तीवर प्रवासाची परवानगी दिली जात आहे. एसटीने बुधवारी प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक सूचना काढत कुणालाही सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्याशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नाही, मास्क सक्तीसह इतरही अटींची सक्ती केली आहे.