लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : अमरावती मतदारसंघातील उत्‍कंठावर्धक ठरलेल्‍या लढतीत राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्‍या सुलभा खोडके यांच्‍या विजयासोबतच आझाद समाज पार्टीचे डॉ. अलीम पटेल यांनी मिळवलेल्‍या ५४ हजार ५९१ म्‍हणजे एकूण मतदानाच्‍या २५.३६ टक्‍के मतांची चर्चा रंगली आहे.

तब्‍बल दहा फेऱ्यांमध्‍ये मताधिक्‍य टिकवून ठेवत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या समर्थकांची धडधड वाढविणाऱ्या अलीम पटेल यांना शहरातील मुस्‍लीमबहुल भागातून मिळालेले मतांचे भरभरून दान हे ५४ हजार ५९१ मतांपर्यंत पोहचेल, याचा अंदाज कुणाला आला नव्‍हता. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या सुलभा खोडके या ५ हजार ४१३ मतांनी निवडून आल्‍या, त्‍यांना २५.३६ टक्‍के मते मिळाली. त्‍यांचे निकटचे प्रतिस्‍पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना २५.४ टक्‍के मते मिळाली. अलीम पटेल यांना २५.३६ टक्‍के मतांचा वाटा मिळाला. तर भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांना १५.८३ टक्‍के मते प्राप्‍त झाली.

आणखी वाचा-निकालाच्या एक दिवसाआधी राजकीय संन्यास; पण, पक्ष विजयी होताच माजी आमदाराने…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ४१ हजार ६४८ इतके मताधिक्‍य मिळाले होते. काँग्रेसने हे मताधिक्‍य गृहित धरून यावेळी विजयाची अपेक्षा केली होती. पण, लोकसभेच्‍या विजयानंतर लगेच मुस्‍लीमबहुल भागात ‘अबकी बार, मुस्‍लीम आमदार’ हा नारा ऐकायला आला. लोकसभेत मुस्‍लीम मतांच्‍या बळावर खासदार निवडून येऊ शकतो, मग मुस्‍लीम आमदार का होऊ शकत नाही, याची चर्चा सुरू झाली. यावेळी निवडणूक रिंगणात अलीम पटेल यांच्‍यासह प्रहारचे डॉ. अबरार, मुस्‍लीम लिगचे इरफान खान यांच्‍यासह एकूण सात उमेदवार होते. डॉ. अबरार यांनी प्रचार सुरू होताच माघार घेत डॉ. सुनील देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. त्‍यामुळे डॉ. देशमुख यंची बाजू बळकट झाल्‍याचा दावा देशमुख समर्थकांकडून केला जात असताना पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू होत्‍या.

यावेळी काँग्रेसची भिस्‍त ही मुस्‍लीम समुदायाच्‍या मतदानावर होती. ही एकगठ्ठा मते आपल्‍याला मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते बाळगून होते. पण, एकीचे बळ दाखवून देण्‍याचा संदेश मुस्‍लीमबहुल भागात पसरला आणि डॉ. देशमुख यांच्‍या हातून बाजी निसटत गेली. राष्‍ट्रवादीचे संजय खोडके यांची व्‍यूहनीती मात्र यशस्‍वी ठरली.

आणखी वाचा-ताडोबातील ‘झीनत’ सिमिलीपालच्या जंगलात पोहोचली…

कोण आहेत अलीम पटेल?

कॅम्‍प परिसरात राहणारे अलीम पटेल यांनी दंतशास्‍त्र पदवी (बीडीएस) आणि विधी अभ्‍यासक्रमात पदव्‍युत्‍तर शिक्षण घेतले आहे. गेल्‍या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे लढतीत होते. त्‍यावेळी त्‍यांना केचळ १७ हजार १०३ मते मिळाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did aleem patel of azad samaj party get 54 thousand 591 votes mma 73 mrj