लोकसत्ता टीम

अकोला : मूत्रपिंड (किडनी) हा शरीरातील महत्त्वाचा अवयव असून, त्याची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी वेळीच आवश्यक तपासणी करून घेण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिला आहे.

जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. समाजात याविषयी जनजागृती होण्यासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम घेतले जातात. मूत्रपिंडे शरीरातील पाण्याचा व क्षारांचा समतोल राखण्याचे काम करतात. तसेच शरीरातील हजारो विषारी घटक शरीराबाहेर काढण्यासह रक्तदाब नियंत्रण, व्हिटॅमिन डीची निर्मिती, लाल रक्तपेशी वाढवण्याचे कामही करत असतात. व्हिटॅमिन डीमुळे हाडांना मजबुती मिळते, असे डॉ. गाढवे यांनी सांगितले.

मूत्रपिंड विकाराची विशिष्ट लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब, थकवा, गडद रंगाचे मूत्र, फेसाळ लघवी, लघूशंकेला वारंवार जावे लागणे किंवा प्रमाण बदलणे, स्नायूंना आकुंचन, त्वचेला खाज सुटणे किंवा कोरडी होणे, सूज, पाठदुखी, वारंवार होणारे संक्रमण, यकृत किंवा स्वादुपिंड यासारख्या शरीराच्या इतर भागात गाठी येणे, ऐकण्याची किंवा दृष्टीची समस्या, फुफ्फुसांचे नुकसान ज्यामुळे खोकल्यातून रक्त येऊ शकते, जीभ वाढणे, सहज जखम होणे किंवा डोळ्यांभोवती जांभळे ठिपके येणे, भूक न लागणे आदी लक्षणे आढळल्यास मूत्रपिंडाचा विकार असू शकतो, असे डॉ. गाढवे म्हणाले.

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवा, रक्तदाबाचे निरीक्षण करा, निरोगी आहार आणि वजन नियंत्रित राखा, भरपूर द्रव पिऊन हायड्रेटेड रहा, दररोज किमान तीन लिटर पाणी प्यावे, धूम्रपान टाळा, जास्त प्रमाणात वेदनाशामक औषधे घेऊ नका, मूत्रपिंड तपासणी करून घ्यावी. वेळीच काळजी घेतल्याने मूत्रपिंड पर्यायाने शरीर निरोगी राखण्यास मदत होते, अशी माहिती डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

आहारात या पदार्थांचे करा सेवन

बेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, पालक आणि काळे यासारख्या पालेभाज्या, मासे, लसूण, तपकिरी तांदूळ, संपूर्ण गव्हाची ब्रेड आणि क्विनोआ यांसारखे संपूर्ण फायबर धान्य, सफरचंद, फुलकोबी, लाल बेल मिरची आदींचे सेवन केल्या मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे, वेळेत मूत्रपिंड तपासणी केल्यास पुढील गुंतागुंत टाळणे शक्य आहे, असे देखील डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader