लोकसत्ता टीम

अकोला : रेल्वेच्या हायटेक सुविधेचा लाभ घेण्याकडे प्रवाशांचा कल चांगलाच वाढला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ आणि पैशांची बचत प्रवाशांकडून करण्यात येते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात क्यूआर कोड आधारित व्यवहार आणि ‘यूटीएस’ (अनारक्षित तिकीट प्रणाली) अ‍ॅपच्या वापरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले. रेल्वे प्रवासी डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करीत आहेत.

डिजिटल तिकीट मोडला प्रोत्साहन देणे, स्वयं-तिकीट प्रणालीला चालना देणे आणि प्रवाशांना रांगेत न उभा राहता सहज तिकीट खरेदी करता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर ‘यूटीएस’ मोबाइल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सुविधाही देण्यात आली. क्यूआर कोडच्या माध्यमातून व्यवहाराच्या प्रमाणात फेब्रुवारीमध्ये जानेवारीच्या तुलनेत १.८६ टक्क्याची वाढ झाली. जानेवारीमध्ये हे प्रमाण २४.२० टक्के, तर फेब्रुवारीमध्ये हे वाढून २६.०६ टक्के झाले आहे. त्यामुळे तिकीट प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर झाली. यासाठी नियमित जागरूकता मोहिमा, प्रात्यक्षिके आणि स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन केले.

भुसावळ विभागात ‘यूटीएस ऑन मोबाइल’ अ‍ॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारीमध्ये अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांचे सरासरी प्रमाण ८.३६ टक्के नोंदवले गेले. विभागातील सर्व स्थानकांवर प्रवाशांना अ‍ॅपच्या फायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत प्रवाशांना वैयक्तिक मार्गदर्शन, स्थानकांवरील उद्घोषणा आणि प्रमुख ठिकाणी माहितीपर फलकाद्वारे माहिती देण्यात आली. ‘यूटीएस अ‍ॅप’मुळे प्रवाशांना रांगेत उभे न राहता सहज तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते, त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि सुट देखील मिळते.

‘क्यूआर कोड आधारित पेमेंट’ आणि ‘यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप’च्या माध्यमातून तिकीट काढण्यात झालेल्या वाढीमुळे रोख व्यवहार आणि तिकीट खिडकीवरील लांबच लांब रांगाच्या प्रमाणात घट झाली. या बदलामुळे तिकीट प्रक्रिया सुलभ झाली. प्रवाशांसाठी बुकिंग अनुभव अधिक वेगवान आणि प्रभावी बनले आहेत. भुसावळ विभागात डिजिटल उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबविल्या जात आहेत. डिजिटल पेमेंट प्रणाली आणि मोबाइल अ‍ॅपच्या वापराला प्रोत्साहन देऊन रेल्वे प्रवास अधिक सुकर आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवण्याचे लक्ष्य असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.