लोकसत्ता टीम
अमरावती : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीसाठी अत्यंत लाभदायक ठरली. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते, अशी चर्चा सुरू झाली. यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, निवडणुकीआधी जेव्हा लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली, तेव्हा पात्र, अपात्र न पाहता लाभ देण्यात आला, पण आता निवडणूक आटोपल्यानंतर निकष लावले जात आहेत. या विरोधात लाडक्या बहिणींना खरेतर रस्त्यावर उतरावे लागेल. ही त्यांची फसवणूक आहे. लाडक्या बहिणींना सरकारने दरमहा पंधराशे रुपये देऊ केले. पण, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हमीभावापेक्षा २ हजार रुपये कमी किमतीत सोयाबीन विकावे लागले. इतर शेतमालाचीही हीच परिस्थिती आहे. एकीकडे गरीब भावाच्या खिशातून २ हजार रुपये काढून घ्यायचे आणि बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे, तरीही सरकार पाचशे रुपयांनी नफ्यातच आहे. ही विचित्र स्थिती आहे. सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांचीही फसवणूक केली आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार अर्जांची छाननी होईल. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील, तर लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. अशा महिला लाभ घेत असतील, तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही. आधार कार्डवर नाव वेगळे आणि बँकेत नाव वेगळे अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे. विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे. निवडणुकीनंतर सरकारने लाडकी बहीण योजनेचे निकष बदलल्याबद्दल बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे.
निवडणुकीच्या आधी लोकप्रिय घोषणा करायच्या, नंतर निकष बदलायचे, या विषयी निवडणूक आयोगाने पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.