लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सरकारी रुग्णवाहिकामधून पैसे कमावण्याचा उद्योग सरकार बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, खास ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारचा आटापिटा सुरुच आहे. या महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात असल्याचा संशय देखील बळावतो आहे. याबाबत सरकारकडे पत्राद्वारे तक्रार करून, पत्रकार परिषदेतून आवाज उठवून देखील गेंड्याच्या कातडीचे सरकार कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे हा रुग्णवाहिका महाघोटाळा थांबवला नाही तर मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दिला आहे.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेच्या निविदाचे गौडबंगाल सुरूच आहे. ही निविदा आता दोन ठेकेदारांना विभागून देण्याची शक्कल लढवली जात आहे. नव्या टेंडरनुसार ठेकेदारास वार्षिक सुमारे ७५० कोटी रुपये तर १० वर्षांपोटी सुमारे ९ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. प्रत्यक्षात ठेकेदाराची एकावेळची गुंतवणूक फक्त ८०० कोटींच्या घरात आहे. मात्र, प्रशासनावर दबावतंत्र वापरून टेंडरचे आकडे दुप्पटीपेक्षा अधिक फुगवण्यात आले आहेत. रुग्णवाहिका महाघोटाळा समोर आल्यावर आम्ही आवाज उठवला. परंतु सत्ताधीशाच्या पुत्राच्या मर्जीतील खास ठेकेदाराला, मंत्र्याच्या नातेवाईकाला काम देण्यासाठी सरकार कोणतीही कारवाई करत नाही. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमाला बगल देऊन सरकारचा घोटाळा सुरु आहे.

आणखी वाचा-काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे दहन; महात्मा गांधी, सावरकरांची प्रतिमा भेट देत…

विशिष्ट कंपनीलाच हे टेंडर द्यायचे हे ठरवून प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ठेकेदाराचा या क्षेत्रातील कामाचा कोणताही पूर्वानुभव नाही, तसेच इतके मोठे काम करण्याची त्यांची आर्थिक क्षमता नाही, तरी त्यांच्यासाठी लाल गालिचा सरकारने अंथरला आहे. त्यासाठी ‘स्पेन’स्थित बहुराष्ट्रीय कंपनीची मदत घेतली जात आहे. तांत्रिक बाबींचा आधार घेतला जात आहे. दोनदा नव्याने टेंडर, तीनदा मुदतवाढ अशी पळवाट शोधून शेवटी हे टेंडर विशिष्ट कंपनीलाच दिले जाणार आहे. टेंडरचे दोन भाग करून दोन ठेकेदारांना हे टेंडर विभागून चालवायला दिले जाणार आहे. टेंडरच्या आयडीचेही गौडबंगाल आहे. एकाच टेंडरचे दोन आयडी असल्याची माहिती समोर आहे. याचा शोध घेतल्यास या टेंडरमधील अनागोंदी आणखी चव्हाट्यावर येईल, अशी शक्यता आहे. परंतु सरकारच्या आशीर्वादाने हा महाघोटाळा सुरु असल्याने यावर कोणतीही कारवाई होईल, असे वाटत नाही. त्यामुळे हा ऍम्ब्युलन्स महाघोटाळा सरकारने थांबविला नाही तर मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा वडेट्टीवार दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did opposition leader vijay wadettiwar have to warn of a symbolic hunger strike rbt 74 mrj
Show comments