महेश बोकडे

नागपूर : शहरात २४ तासांत, ग्रामीणमध्ये ४८ तासांत नवीन वीज जोडणी देण्याचा गाजावाजा महावितरणकडून केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक दिवसांपूर्वी पैसे भरल्यावरही राज्यातील १ लाख ६० हजार ३७३ ग्राहकांना नवीन वीज जोडणी मिळालेली नाही. यातील सर्वाधिक १ लाख ९ हजार ७९१ ग्राहक शेतकरी आहेत.

१ लाख ६० हजार ३७३ ग्राहकांनी अनेक दिवसांपूर्वी पैसे भरल्यावरही त्यांना नवीन वीज जोडणी मिळत नसल्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने पुढे आणले. जोडणी न मिळालेल्या ग्राहकांमध्ये ३८ हजार ७३९ ग्राहक घरगुती, ६ हजार २८१ ग्राहक व्यावसायिक, २ हजार २५ औद्योगिक, १ लाख ९ हजार ७९१ शेतकरी, ५८८ पथदिवे संवर्गातील, ४२२ ग्राहक पाणीपुरवठा योजना संवर्गातील तर २ हजार ५०७ ग्राहक इतर संवर्गातील आहेत.

“निधीच्या उपलब्धतेनुसार प्रलंबित जोडण्या दिल्या जातील. महावितरण गरजेनुसार वेगवेगळ्या भागात नवीन वीज मीटर उपलब्ध करत आहे.” – भरत पवार, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

महावितरणकडे गेल्या काही वर्षांपासून नवीन वीज मीटर आणि साहित्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे १ लाख ६० हजार ग्राहक पैसे भरूनही नवीन वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक दिवस जोडणी मिळत नसल्याने ग्राहक वीज कर्मचाऱ्यांवर राग काढतात. हा मुद्दा वारंवार महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला गेला. – कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.

वीज जोडण्यांची सद्यस्थिती

घरगुती सिंगल फेस संवर्गात ३० दिवसांपर्यंत पैसे भरूनही २७ हजार ७८३ ग्राहकांना, १ महिना ते ३ महिनेपर्यंतच्या काळात पैसे भरूनही २ हजार ९४४ ग्राहकांना, ३ महिने ते सहा महिने काळात पैसे भरूनही १ हजार ३३९ ग्राहकांना, ६ महिने ते १२ महिने काळात पैसे भरूनही १ हजार ७०० ग्राहकांना, १ वर्षे ते ३ वर्षे काळात पैसे भरूनही १ हजार ९३२ ग्राहकांना नवीन जोडणी मिळाली नाही. कृषीपंपाच्या थ्री फेस संवर्गात ३० दिवसांपर्यंतच्या काळात पैसे भरूनही ४ हजार ६५४ ग्राहकांना, १ महिने ते ३ महिने काळातील ९ हजार ९३६ ग्राहकांना, ३ महिने ते ६ महिने काळातील १३ हजार ८४२ ग्राहकांना, १ वर्षे ते ३ वर्षे काळातील ५१ हजार ९३६ ग्राहकांना, ३ वर्षांहून जास्त काळापूर्वी पैसे भरूनही ११ हजार ४४३ ग्राहकांना नवीन जोडणी मिळालेली नाही.

Story img Loader