कारमधील १ कोटी ९७ लाखांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी काच फोडून चोरून नेली. ही खळबळजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या गणेश नगर परिसरात २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. मात्र, तक्रार ५ फेब्रुवारीला नोंदविण्यात आली. बिजनेस लोनच्या नावावर जमा केलेली ही रक्कम हवालाची असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये चिंता असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अनिल दशरथ व्यास (वय ४९) रा. चंद्रुमाना, पाटण, गुजरात असे तक्रारदाराचे नाव आहे. व्यास हे हल्ली कोतवालीतील गणेशनगरमध्ये राहत होते.
मुंबईच्या जयेश चव्हाणची नवनीत इंटरप्रायजेस नावाने कुरिअर कंपनी आहे. बहुतांश हवाला व्यावसायी कुरिअर कंपनीच्या नावावरच व्यवसाय करतात. चव्हाणकडे काम करणारे अनिल व्यास, प्रकाश पटेल आणि इतर तिघे गणेश नगरच्या आझमशाहमध्ये राहून कंपनीचा व्यवहार पाहतात. एका इमारतीत त्यांनी भाड्याने फ्लॅटही घेतला आहे. २ फेब्रुवारीला नवनीत इंटरप्रायजेसच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जाऊन १ कोटी ९७ लाख रुपये जमा केले. संपूर्ण पैसे एका बॅगमध्ये ठेवले होते. रात्रीला पैशांची बॅग इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या कारमध्यचे ठेवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पटेल पार्किंगमध्ये आले असता डाव्या बाजूची काच फुटलेली होती. बॅग कारमध्ये नव्हती. त्यांनी घटनेबाबत चव्हाण यांना सांगितले.
हेही वाचा – नागपूर: ९ व १० फेब्रुवारीला महाराष्ट्र बंकेचा देशव्यापी संप
हेही वाचा – ‘नॉन क्रिमीलेअर’ची अट जाचक, उमेदवार ‘एमपीएससी’च्या मुलाखतीला मुकणार
आधी पोलिसात तक्रार करण्याचे टाळण्यात आले. मात्र, मोठी रक्कम चोरी झाल्याचे वृत्त पसरले. पोलिसांनाही घटनेची माहिती मिळाली. अखेर रविवारी अनिल व्यास आणि पटेलने कोतवाली पोलिसात तक्रार केली. कंपनीसाठी वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून बिजनेस लोन घेण्यात आले होते, मात्र वास्तवात ते पैसे हवालाचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.