लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: बिल्डरची फसवणूक केल्या प्रकरणी क्रिएटीव्ह इंफ्रास्ट्रक्चरच्या दोन संचालकांना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली तर अन्य तिघे फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडूरंग महादेव मुलार (नंदनवन), नितीश कृष्णराव तुंगार (रेशिमबाग), विलास श्रीराम मूर्ती (रमनामारोती),सुभाष दयाराम लांबट (रेणूकामातानगर) आणि जितेश नामदेव मदनकर यांनी क्रिएटीव्ह इंफ्रास्ट्रक्चर नावाने कंपनी स्थापन केली. २०१२ मध्ये हुडकेश्वरातील एका भूखंडावर फ्लॅट स्किम बांधण्याची घोषणा केली. त्यासाठी २०२२ पर्यंत संचालकांनी अनेकांकडून लाखो रुपये घेतले. मात्र, बांधकाम केले नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांनी संचालकांच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारल्या. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणुकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात क्रिएटीव्ह इंफ्रास्ट्रक्चरच्या संचालकांच्या विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा… राज्यात ३१ मे पर्यंत अनुभवता येणार शून्य सावली दिवस

मात्र, संचालकांकडे पैसे नसल्यामुळे कारागृहात जाण्याची वेळ आली. त्यामुळे संचालकांनी दुसऱ्या एका बिल्डरची फसवणूक करून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यांनी राजेश ज्ञानदेव तिडके (४३, छत्रपती चौक) या बिल्डरची भेट घेतली. त्यांचा हुडकेश्वरमधील पूर्ण प्रकल्प विकास करण्याचा करार तिडके यांच्याशी ११.५० कोटींमध्ये करार केला. तिडके यांनी भूखंडावर विकासकाम सुरु केले. त्याबदल्यात क्रिएटीव्ह इंफ्रास्ट्रक्चरच्या संचालकांना वेळोवेळी पैसे दिले. काही गुंतवणुकदारांनाही पैसे परत करण्यास मदत केली.

गुपचूप केला दुसऱ्याशी सौदा

पाचही संचालकांनी राजेश तिडके यांच्याकडून जवळपास १.८० कोटी रुपये घेतल्यानंतर विकास करारनामा आणि अन्य कागदपत्रांची कारवाई केली. त्यानंतर गुपचूप अन्य एका बिल्डरशी संपर्क साधून प्रकल्प विक्रीचा सौदा केला. बिल्डरकडूनही ४ ते ५ कोटी रुपये घेतले. एकाच भूखंडावर विकास करण्याचा सौदा दोघांशी केल्याचा कट उघडकीस आला. या प्रकरणी तिडके यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पांडूरंग मुलार, नितीश तुंगार यांना अटक केली तर विलास मूर्ती, सुभाष लांबट आणि जितेश मदनकर हे फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.