संजय मोहिते, लोकसत्ता
बुलढाणा: “आई, आई माझा निकाल कधी लागणार? बेटा ६ मे ला”. हा संवाद आता घरोघरी ऐकायला मिळणार आहे. १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन, त्याची राजकारण्यांना ‘एक इन्व्हेंट’ म्हणून प्रतीक्षा राहते. आज साजरा होणारा आंतरराष्ट्रीय कामगार दिन लाखो कामगारांचा जणू सणच. मात्र आजचा दिवस जिल्ह्यासह राज्यातील लाखो नव्हे कोट्यवधी विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही बहुप्रतिक्षित आणि निर्णायक दिवस ठरतो. कारण आज त्यांच्या वार्षिक परीक्षेचा निकाल लागतो. मात्र यंदा निकालाचा हा मुहूर्त अनेक दशकांनंतर हुकला. त्यामुळे बालवाडी, इयत्ता १ ते ९ च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा >>> Video : चंद्रपुरात मुसळधार पाऊस व गारपीट; आझाद बागेसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी
यामुळे या बालकासह निकालाची जास्त काळजी असणाऱ्या पालकांचा जीव ६ मेपर्यंत टांगणीला लागणार आहे. होय!, कारण यंदाचे निकाल व गुणपत्रिका वितरण येत्या शनिवारी ( दि ६) होणार आहे. याचे कारण सरकारच्या सहमतीने शिक्षण संचालक( प्राथमिक) शरद गोसावी यांनी जारी केलेला आदेश होय! अर्थात त्याला कारणही तेवढेच संयुक्तिक आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाची सांगता ६ मे रोजी होत आहे. यामुळे या मुहूर्तावर शाळांचे निकाल जाहीर करून गुणपत्रिका वितरण करण्यात यावे, असे निर्देश संचालकांनी आदेशात दिले आहे. नुसताच निकाल न लावता या दिवशी विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्याचेही नमूद करण्यात आले आहे.