गडचिराेली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले मानव-वन्यजीव संघर्षाचे सत्र २०२४ या वर्षातही कायम हाेते. २०२४ या वर्षात वाघांनी सहा तर रानटी हत्तींनी चार असे एकूण १० बळी घेतले. वन विभागाने पीडित कुटुंबांवर आर्थिक मदतीची फुंकर घातली असली तरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आणखी किती बळी जातील, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून वाघांसह रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १० नागरिकांना जीव गमवावा लागला. २०२४ या नवीन वर्षाची सुरुवात हाेताच ३ जानेवारीला वाकडी येथील एका महिलेचा बळी वाघाने घेतला. या वर्षाची सुरुवातच वाघाच्या हल्ल्याने झाली. त्यानंतर याच महिन्यात वाघाने चार बळी घेतले. मानव-वन्यजीव संघर्षाचे हे सत्र उन्हाळ्यातही सुरूच हाेते. भामरागड वन विभागात रानटी हत्तीने प्रवेश करून तेथील नागरिकांचे बळी घेतले. वाघ व हत्तींच्या हल्ल्याचा धाेका थांबलेला नाही. २०२४ या सरत्या वर्षात कुरखेडा (सावरगाव) येथील महिलेचा बळी घेऊन मानव-वन्यजीव संघर्ष जिल्ह्यात अजूनही कायम असल्याची जाणीव करून दिली.
हेही वाचा >>>नितेश राणेना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसचा सवाल
२.२५ कोटींची मदत
जिल्ह्यात २०२४ या सरत्या वर्षात वाघ व हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला वन विभागाच्यावतीने प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्यात आले आहे. एकूण ९ जणांच्या कुटुंबीयांना २ काेटी २५ लाख रुपये अदा केले, तर शेवटच्या एका प्रकरणात प्राथमिक स्वरूपात ३० हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली.
वाघांच्या हल्ल्यात पाच जण ठार
– ३ जानेवारी- मंगलाबाई विठ्ठल बाेडे, वाकडी
– ७ जानेवारी – सुषमा देवीदास मंडल, चिंतलपेठ
– १५ जानेवारी – रमाबाई शंकर मुंजमकर, काेपरअल्ली
– १८ जानेवारी – बाबूजी नानाजी आत्राम, रेंगेवाही
– १५ मे – पार्वता बालाजी पाल, आंबेशिवणी
– ६ डिसेंबर – शारदा महेश मानकर, कुरखेडा (सावरगाव)
हत्तींनी घेतला चार जणांचा जीव
– २५ एप्रिल – गाेंगलू रामा तेलामी, कियर
– २५ एप्रिल – राजे काेपा हलामी, हिदूर
– २५ एप्रिल – महारी देवू वड्डे, हिदूर
– २४ ऑक्टाेबर – शशिकांत रामचंद्र सतरे, नवेगाव (ता. मूल)