नागपूर : विविध टास्कच्या नावावर महिलेला पैसे गुंतवणुकीवर जास्त नफ्याचे आमिष देत सायबर गुन्हेगारांनी १० लाखांनी गंडा घातला होता. परंतु सायबर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान थेट तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्याचा वापर करुन आरोपीचे बँक खातेच गोठवले आणि त्याच्या घशातून महिलेची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी भारती (रा. नागपूर) यांना सायबर गुन्हेगारांनी व्हाट्सअॅपवर लिंक पाठवून टास्क दिला. व्हिडिओ लाईक केल्यास शंभर रुपये मिळतील अशी बतावणी केली. त्याचे ‘स्क्रीन शॉट’ पाठविण्याचे सांगून भारती यांच्या बँकेची माहिती मागवून नंतर ‘पार्ट टाईम जॉब’साठी विचारणा करीत टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करण्यास सांगून टास्क दिले. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यास पैसे बँक खात्यात येतील असे सांगून टेलिग्राम ग्रुपवर टास्क देऊन पैसा गुंतवणूक केल्यास जास्ता नफा मिळेल असे आमिष दाखविले. या माध्यमातून आरोपींनी भारती यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर १० लाख पाठविण्यास सांगून त्यांची फसवणूक केली.
हेही वाचा >>> विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याला प्रथम प्राधान्य; विधानसभाध्यक्षांची ग्वाही; माता महाकाली महोत्सवाचा शुभारंभ
याप्रकरणी भारती यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींने त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यात भारती यांची रक्कम वळती करून घेतली असल्याचे सायबर पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधार कौशल्याचा वापर करुन निष्पन्न केले. त्यामध्ये मनीट्रेल, केवायसी व सीडीआरचे सखोल विश्लेषण करुन आरोपीचे बँक खाते गोठवले. भारती यांनी त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी न्यायालयातही अर्ज सादर केला. सायबर पोलिसांनी याबाबत न्यायालयात अहवाल सादर करून पाठपुरावा केला. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशान्वये भारती यांनी पूर्ण रक्कम तीन महिन्याच्या आत परत मिळाली आहे. ही कारवाई आर्थिक व सायबर शाखेचे पोलीस उपआयुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस, पोलीस उपनिरीक्षक केतकी जगताप व महिला पोलीस नायक रेखा यादव यांनी केली.