नागपूर : अति मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सर्वश्रूत आहे. त्यानंतरही अनेक जणांचे मद्यपानावर नियंत्रण नाही. मेडिकल, मेयो, एम्स या शासकीय रुग्णालयात रोज अति मद्यपान करणाऱ्या दहा रुग्णांना गंभीर अवस्थेत दाखल केले जाते. तर उपचारादरम्यान विविध गुंतागुंत वाढून आठवड्यात या तिन्ही रुग्णालयांत सुमारे दहा मृत्यू नोंदवले जातात.
वेदनारहित रक्ताच्या उलट्या होऊन मेडिकल, मेयो, एम्स रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण हे बहुतेक लिव्हरच्या सिरॉसिस आजाराने ग्रस्त असतात. पूर्वी लिव्हर सिरॉसिस अति मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्येच आढळायचे. परंतु, आता मेडिकल, मेयो एम्समधील एकूण लिव्हर सिराॅसिसच्या रुग्णांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्णांचा इतिहास अति मद्यपानाचा असतो. नागपुरातील मेडिकल, मेयो, एम्स या तिन्ही रुग्णालयांत रोज गंभीर अवस्थेत अति मद्यपान करणारे सुमारे १० रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतात. येथील डॉक्टरांच्या प्रयत्नाने अनेक जण बरे होतात. यावेळी डॉक्टरांकडून सगळ्याच व्यसनी रुग्णांना पुन्हा मद्यपान केल्यास जिवाला धोका असल्याचे स्पष्ट केले जाते. त्यानंतरही ९० टक्के नागरिकांकडून अति मद्यपान कायम राहते. त्यामुळे पुन्हा अति मद्यपानाने हे रुग्ण पुन्हा-पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल होतात. सातत्याने अति मद्यपानाने अनेक रुग्णांना लिव्हर सिरॉसिस होते. या आजारात यकृताचे विघटन होऊन ते अत्यंत घट्ट होते. यामध्ये ‘लिव्हर’ बहुतांशी खराब होऊन नष्ट झालेले असते व त्याची जागा तंतूंनी घेतलेली असते. ‘लिव्हर’ कडक झालेली असते, त्याचा आकारही अगदी लहान झालेला असतो. त्यामुळे इतरही आजाराची गुंतागुंत रुग्णात वाढून आठवड्यात मेडिकल, मेयो, एम्स या रुग्णालयांत दहा मृत्यू नोंदवले जातात.
हेही वाचा – नागपूर : तरुणीला नोकरीचे आमिष; जंगलात नेऊन बलात्कार
“अनेक जण आनंद व मनोरंजनाचे साधन म्हणून मद्यपानाकडे बघतात. मद्यपानाने गुंतागुंत वाढून आजारपण, कौटुंबिक आयुष्यात वादविवादासह इतरही समस्या उद्भवतात. त्या सोडवण्यासाठी रुग्णाची इच्छाशक्तीसह मानसोपचार तज्ज्ञ, कौटुंबिक सदस्य, मित्रांची भूमिका महत्त्वाची आहे. सामूहिक प्रयत्नाने अति मद्यपानाचे व्यसन सोडवून अनेकांचे मृत्यू टाळता येतात.” – डॉ. निखिल पांडे, अध्यक्ष, मानसोपचार सोसायटी, नागपूर शाखा.