नागपूर : घरातील, हॉटेलमधील शिळे अन्न किंवा कुठल्याही वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत टाकून त्या रस्त्यावर किंवा कचऱ्याच्या ठिकाणी फेकल्या जातात. या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे विदर्भातील १० टक्के जनावरे आजारी पडून त्यांचा मृत्यू होत असल्याचे नागपूर महापालिका आणि गोशाळा महासंघाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
गेल्यावर्षी नागपूरच्या गोरक्षण सभेमध्ये एका गाईच्या पोटातून २० किलो प्लास्टिक काढण्यात आले होते. या प्लास्टिकमुळे जनावरांच्या आतडय़ांवर परिणाम होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण
होतो. देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये विविध ठिकाणाहून आणलेली जनावरे ठेवली जातात. त्यातील बहुंताश जनावरे प्लास्टिकचे सेवन केल्यामुळे आजारी पडत असल्याचे दिसून आले आहे.
कचऱ्याच्या ठिकाणी प्लास्टिक बॅग असतील तर आम्ही त्या कचऱ्यासोबतच उचलत असतो. जनावरे कचऱ्याच्या ठिकाणी जाऊ नये यासाठीही प्रयत्न केले जातात. नागरिकांनी पर्यावरणाचे भान बाळगून प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. -डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, नागपूर महापालिका.
जबडय़ांच्या रचनेमुळे आपण काय खात आहोत, हे जनावरांना कळत नाही. प्लास्टिकचे पचन होत नसल्याने ते पोटात साठून राहते. परिणामी, पचनसंस्थेमध्ये अडचणी येतात . – डॉ. सुनील सूर्यवंशी, संयोजक, महाराष्ट्र गो सेवा महासंघ.