वर्धा : डोक्यावर दडपण म्हणून पालक व विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस गांभीर्याने घेतात. शालेय परीघ ओलांडून नव्या शैक्षणिक वाटचालीस याच परीक्षेने आरंभ होतो. म्हणून जोमाने तयारी केली जाते. नापास झाल्यास नैराश्याचे वारे कुटुंबात वाहू लागतात. हे टाळावे म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईने एक नवे धोरण लागू केले आहे.
धोरणानुसार दहावीचा विद्यार्थी तीन अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही एका विषयात, उदाहरनार्थ विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान यात नापास झाला आणि सहावा पर्यायी विषय म्हणून देऊ केलेल्या कौशल्य विषयात तो उत्तीर्ण झाला तर नापास झालेल्या विषयाची जागा कौशल्य विषयाने घेतल्या जाईल. परिणामी दहावीच्या परीक्षेचा निकाल त्यानुसार गृहीत धरल्या जाणार. त्यामुळे नापास झाला तरी चिंता करण्यासारखी बाब उरणार नाही. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र यासारखे दहावीत अनिवार्य असलेले विषय ज्या विद्यार्थ्यांना अवघड वाटतात त्यांना या उपायाचा लाभ मिळणार. कौशल्य विषय त्याची पूर्ती करणार.
हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?
सीबीएसईने कौशल्य विषयाची यादीच नमूद केली आहे.
माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा, ऑटोमोटिव्ह, आर्थिक बाजारपेठ परिचय, पर्यटन, सौंदर्य व निरोगीपणा, कृषी, अन्न उत्पादन, फ्रंट ऑफिस ऑपेरेशन, बँकिंग आणि विमा, विपणन आणि विक्री, आरोग्य सेवा, परिधान, मल्टी मीडिया, मल्टी स्किल फॉउंडेशन कोर्स, आर्टिफिशिअल इंटलेजन्स, फिजिकल अॅक्टिव्हिटी ट्रेनर, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर, सायन्स आणि डिझाईन थिंकिंग आणि इनोव्हेशनसाठी पायाभूत कौशल्ये.