लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे १० हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची १५१ तर मदतनीसची ४१६ पदे रिक्त आहेत. सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्तपदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत ५ फेब्रुवारी ते २० मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत २५ सेविका व ४९ मदतनीस, बार्शी प्रकल्पाअंतर्गत २३ सेविका व २४ मदतनीस, वैरागअंतर्गत १४ सेविका व १५ मदतनीस, करमाळा प्रकल्पाअंतर्गत सात सेविका व २९ मदतनीस, माढ्याअंतर्गत १४ सेविका व १० मदतनीस, कुर्डुवाडी-टेंभुर्णी प्रकल्पाअंतर्गत दोन सेविका, सहा मदतनीस, माळशिरस प्रकल्पाअंतर्गत दोन सेविका, १०५ मदतनीस, अकलूजअंतर्गत चार सेविका व १४ मदतनीस, मंगळवेढा प्रकल्पाअंतर्गत तीन सेविका, सहा मदतनीस, मोहोळअंतर्गत तीन सेविका व १५ मदतनीस, उत्तर सोलापूर प्रकल्पाअंतर्गत १४ सेविका व सात मदतनीस, पंढरपूर एक व पंढरपूर दोन प्रकल्पाअंतर्गत २२ सेविका व ८२ मदतनीस, सांगोलाअंतर्गत पाच सेविका व सात मदतनीस, कोळाअंतर्गत चार सेविका व आठ मदतनीस आणि दक्षिण सोलापूर प्रकल्पाअंतर्गत नऊ सेविका व ३९ मदतनीस, अशी भरती होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार ७६ सेविकांची पदे मंजूर असून त्यातील तीन हजार ९२५ पदे भरलेली आहेत. तर मदतनीस यांची चार हजार ७६ पदे मंजूर असून त्यातील ४१६ पदे रिक्त आहेत. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविले जाणार आहेत. सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्णची अट आहे. दरम्यान, सोलापूरसह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यांमधील सुमारे १० हजार पदे (सेविका व मदतनीस) २० मार्चपूर्वी भरली जाणार आहेत.

ठळक बाबी…

  • अंगणवाडी सेविका पदासाठी १२ वी उत्तीर्णची अट
  • राज्यभरातील १० हजार पदे (अंगणवाडी सेविका व मदतनीस) भरली जाणार
  • ५ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करुन शैक्षणिक कागदपत्रांद्वारे होणार भरती
  • ऑगस्ट २०२२ पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी

Story img Loader