लोकसत्ता टीम

अमरावती: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथील विकास आराखड्यातील मुलभूत सुविधांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते, पण निधी अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे येथील मुलभूत सुविधांची अनेक कामे प्रलंबित आहेत. या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात पाठविलेल्या आराखड्यानुसार अतिरिक्त १०० कोटी रुपये विकास निधी तत्काळ मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे केली आहे.

जिल्‍ह्यात २००७ मध्‍ये आलेल्‍या महापुरात अनेक गावांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील दर्जेदार पुनर्वसनाच्या कामासाठी २ कोटी ४३ लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मोझरी, कोंडण्यपूर, वलगांव विकास आराखड्यातील विविध प्रलंबित कामे पूर्णत्‍वास नेण्‍यासाठी निधी मिळावा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली. मोझरी विकास आराखड्याअंतर्गत अध्यात्मिक केंद्र, प्रबोधिनी व ग्रामसचिवालय इमारत येथील फर्निचर व इतर मूलभूत सुविधांसाठी २४ कोटी, कौंडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत इमारत व फर्निचर आणि इतर मुलभूत सुविधांकरिता २.५ कोटी, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगांव विकास आराखड्यांतर्गत इमारत व फर्निचरसह इतर मुलभूत सुविधांकरिता १० कोटी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आणखी वाचा-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २२ जूनला नागपूरला येणार, पण …

अमरावती तालुक्यातील पेढी बॅरेज, उपसासिंचन प्रकल्पातील रोहणखेड, पर्वतापूर व दोनद येथील प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन करण्याचे काम गेल्या १५ वर्षापासून रखडलेले आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. निम्नवर्धा प्रकल्पांतर्गत धारवाडा, दुर्गवाडा येथील ३५८ कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशीही मागणी यापत्रातून करण्यात आली आहे.

Story img Loader