लोकसत्ता टीम
नागपूर : नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या इमारतीला १०० वर्षे झाली असून या शंभर वर्षांच्या काळात हे स्थानक स्वातंत्र्य चळवळ, कामगार चळवळ यासह अनेक स्थित्यंतराचे साक्षीदार ठरले आहे. या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकावरून अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवास केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्थानक भेटीचीही येथे नोंद आहे.
१५ जानेवारी १९२५ रोजी तत्कालीन मध्य प्रांतांचे राज्यपाल सर फ्रँक स्लाय यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन झाले होते. रेल्वेस्थानकाच्या वास्तूला हेरिटेजचा दर्जा आहे. या स्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे हावडा-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई येथून गाड्या आहेत. याठिकाणी असलेले ‘डायमंड क्रॉसिंग’ हे स्थानकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
आणखी वाचा-अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
दररोज २८३ रेल्वे
नागपूर स्थानकावरून दररोज सरासरी २८३ रेल्वेंचे व्यवस्थापन करण्यात येते. ९६ रेल्वे येथून सुरू होतात किंवा येथे त्यांचा प्रवास पूर्ण होतो. १८ गाड्या याच ठिकाणाहून प्रवास प्रारंभ करतात. २०२३-२४ दरम्यान, याठिकाणी २.८६ कोटी प्रवाशांची नोंद झाली, ज्याची रोजची सरासरी ६४.५४२ इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात ही संख्या ६८,७२९ प्रवाशांपर्यंत वाढली आहे. नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानक हे भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी आहे. देशाच्या चारही दिशांना जाण्यासाठी येथून रेल्वे उपलब्ध आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस
नागपूर येथून सिकंदराबाद, बिलासपूर आणि इंदूरसाठी वंदे भारत एक्स्प्रेस ही अत्याधुनिक रेल्वे सेवा सुरूआहे. याशिवाय नागपूर ते मुंबई आणि नागपूर पुणे या मार्गावर स्लिपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
आणखी वाचा-विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
१९२० मध्ये महात्मा गांधींची भेट
नागपूर रेल्वेस्थानकाचा प्रवास १८६७ साली सुरू झाला. यावर्षी पहिल्यांदा येथे रेल्वे आली. १९२० साली या स्थानकाला ‘जंक्शन’ दर्जा देण्यात आला. त्याच वर्षी महात्मा गांधी असहकार आंदोलनादरम्यान येथे आले होते.
स्थानकाचा पुनर्विकास
नागपूर रेल्वेस्थानक आता पुनर्विकसित होत आहे. ४८८ कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत स्थानकाला जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी सुसज्ज केले जात आहे. मात्र, मूळ इमारतीत कोणताही बदल केला जाणार नाही. याशिवाय नागपूर ते सेवाग्राम, नागपूर ते इटारसी आणि नागपूर ते राजनांदगाव मार्गावर रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका टाकण्यात येत आहे.