नागपूर : पारतंत्र्यात उदयाला आलेले नागपूर विद्यापीठ आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही अनेक पैलूंनी विकसित होत आहे. कितीतरी जणांना या ज्ञानसागराने घडवले. ४ ऑगस्टला शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या नागपूर विद्यापीठाने देशात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अनेक रत्नांना घडवले. ज्यामध्ये माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रीय पक्षांचे अध्यक्ष यांच्यासह सर्वाधिक पदव्या घेणारे तरूण पदवीधारक श्रीकांत जिचकारांसारख्यांचा दिग्गजांचाही समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ मध्ये झाली. मध्य भारतातील हे सर्वात जुने विद्यापीठ आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठामधून शिक्षण घेऊन पुढे भारतीय राजकारणामध्ये उडी घेत देश आणि जगात कीर्ती मिळवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची यादीही मोठी आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या राजकारणातून तालीम घेतली. राजकारणातील सर्वोच्च पदावर पोहोचलेले माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि माजी उपराष्ट्रपती न्या. मोहम्मद हिदायतुल्ला हे याच विद्यापीठाचे विद्यार्थी. आयएएस, आयपीएससह अनेक पदव्या घेणारे माजी अर्थमंत्री डॉ. श्रीकांत जिचकार हेही नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी. केंद्रीय नभोवाणी मंत्री असताना नागपुरात पहिला रंगीत दूरचित्रवाणी संच आणणारे वसंत साठे यांनीही नागपूर विद्यापीठातून शिक्षण घेतले. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते ए.बी. बर्धन, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अनेक वर्षे केंद्रामध्ये मंत्री असलेले एन.के.पी. साळवे यांच्याही नावाचा यात समावेश आहे. देशात ‘रोडकरी’ म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी राज्यपाल प्रभा राव, माजी राज्यपाल रा.सू. गवई, नायब राज्यपाल रजनी रॉय, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, नागपुरातील पहिला उड्डाणपूल बांधणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री सरोज खापर्डे, विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक यांच्यासह अनेक दिग्गज राजकाऱ्यांनी कधीकाळी नागपूर विद्यापीठातून उच्च शिक्षणाचे धडे घेतले आहेत.

हेही वाचा >>>तेलांगणात कर्जमाफी.. ‘बीआरएस’चा नागपुरात जल्लोश.. पण फटाक्यांवर पाणी..

हेही वाचा >>>केस नीट भादरले नाही म्हणून हल्ला, गुन्हा दाखल

राज्याला दिले चार मुख्यमंत्री

सर जमशेदजी टाटा यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून विद्यापीठाची मूळ वास्तू १९३५ च्या सुमारास उभी राहिली. या वास्तूने पुढे महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले. हा गौरवशाली इतिहास कधीही न विसरता येणारा आहे. यामध्ये राज्याचे दुसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, दादासाहेब कन्नमवार, सुधाकरराव नाईक आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 years of nagpur university dag 87 amy