संजय मोहिते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: करिअरच नव्हे तर जीवनातील निर्णायक वळण व खडतर समजली जाणारी राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा यंदा विचित्र व गंभीर पार्श्वभूमीवर पार पडत आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील दहा हजार उमेदवार परीक्षा होणार आहे की नाही? अशी शंका मनात ठेवूनच तयारीवर अंतिम फिरवत आहे. प्रशासकीय वर्तुळातही हाच गंभीर संभ्रम घोंगावत असताना यंत्रणांनी परीक्षेची पूर्वतयारी चालवली आहे.

येत्या ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात तब्बल ९ हजार ९८४ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये काही हौशी वा नवखे सोडले तर वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींची संख्या लक्षणीय आहे. २१ एप्रिलपर्यंत सर्व काही आलबेल होते. परीक्षार्थींना प्रतीक्षा असलेली प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली.

हेही वाचा… छत्तीसगड, झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला खरा, पण काही तासांनी तो श्वास अडकला! याचे कारण हीच प्रवेश प्रमाणपत्रे समाज माध्यमावर झळकली. यामुळे जिल्ह्यातील १० हजार उमेदवार हादरले. सार्वत्रिक झालेल्या प्रवेश प्रमाणपत्रांमध्ये बुलढाण्यातील किती उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे होती, याचे उत्तर स्थानिक प्रशासनाकडे नाही, हे आज जिल्हा कचेरीत विचारणा केल्यावर स्पष्ट झाले. ‘ते आयोगालाच माहीत’ असे शासकीय थाटाचे उत्तर प्रस्तुत प्रतिनिधीला आज, मंगळवारी संध्याकाळी मिळाले.

हेही वाचा… चंद्रपूरचे आजी, माजी पालकमंत्री कर्नाटक निवडणुक रणधुमाळीत

धाकधूक अन् संभ्रम

जिल्हाधिकारी एच.पी. तुम्मोड व निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या परीक्षेची संभ्रम आणि धाकधुकीतच तयारी सुरू आहे. उमेदवार संख्या जास्त असल्याने तब्बल ३१ परीक्षा केंद्रे असून ४१६ खोल्यात परीक्षा पार पडणार आहे. बुलढाणा शहरात १५, चिखलीत ११, खामगावमध्ये ५ परीक्षा केंद्रे आहेत. ३१ केंद्रप्रमुख, १४३ पर्यवेक्षक, ६२ केंद्र लिपिक, ४०० समावेशक व १२४ चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळून ८४० अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यांचे प्रशिक्षण बुधवार, २६ एप्रिलला पार पडणार आहे. रविवारी सकाळी ११ ते १२ दरम्यान परीक्षा होणार असली तरी उमेदवारांना दहा वाजताच प्रवेश देण्यात येणार आहे.