लोकसत्ता टीम
बुलढाणा : जिल्ह्यातील १०३ जलनमुने दूषित आढळून आले आहे. शेगाव तालुक्यातील माटरगाव बुद्रुक या केस गळती व टक्कल बाधित गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर ही आकडेवारी आरोग्य यंत्रणा व गावकऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे.
बुलढाणा येथील जिल्हा प्रयोगशाळा, उप विभागीय आणि लघु प्रयोगशाळा मध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जल नमुने तपासणी साठी पाठविण्यात येतात .मुख्य अणूजीव शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली या जल नमुन्यांची तपासणी करण्यात येते. हे नमुने नियमितपणे पाठविण्यात येतात. मागील डिसेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तीन स्तरावरील प्रयोग शाळांना २१०२ जल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील १०३ जलनमुने दूषित असल्याचे तपासणी अंती आढळून आले आहे.
यातही सिंदखेडराजा तालुक्यातील तब्बल चौदा टक्के तर मेहकर, लोणार तालुक्यातील प्रत्येकी ९ टक्के जल नमुने दूषित आढळून आले असल्याचे डिसेंबर महिन्याच्या अहवालावरून निष्पन्न झाले आहे. जिल्ह्याची सरासरी ५ टक्के असल्याचे हा अहवाल सांगतो. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा चे प्रभारी सहायक अणू जीव शास्त्रज्ञ आनंद खरात यांनी ही माहिती दिली .यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. या दूषित पाण्यामुळे गावांमध्ये आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.यामुळे अनेक गावांमध्ये आजही दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे . प्रत्येक गावास शुद्ध पाणीपुरवठा करणे अद्यापही शक्य झालेले नाही हे देखील स्पष्ट झाले.
अशी आहे कार्यपद्धती
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा च्या वतीने दूषित जल नमुन्याची माहिती संबधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात येते. वैद्यकीय अधिकारी संबधित ग्रामपंचायत ला ही माहिती देऊन उपाययोजना करण्याचे निर्देश देतात. त्यानंतर पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात. यानंतर क्लोरिन वापरून पाणी शुद्ध करण्यात येते .शुद्धीकरण करण्यात आल्यावर हे पाणी नमुने पुन्हा जिल्हा प्रयोगशाळा ला पाठविण्यात येतात. त्याचा अहवाल चांगला आल्यावर त्या जलस्त्रोत मधील पुन्हा पिण्यासाठी वापरण्याची अनुमती देण्यात येते.