नागपूर : देशात यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्हातच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली. मार्च संपण्याआधीच दोनवेळा उष्णतेची लाट देखील येऊन गेली. अधूनमधून अवकाळी पावसाची हजेरी देखील सुरू आहे. तरीही देशाच्या अनेक भागात तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. महाराष्ट्रात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर शेतकरी देखील सुखावला आहे.
भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत २०२५च्या मान्सूनच्या हंगामासाठी पहिला अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार यंदा भारतात सरासारीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस अपेक्षित आहे, जो दीर्घकालीन सरासरीच्या १०५ टक्के असेल, असे भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) प्रमुख मृत्यूंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पावसाळ्यात भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भारतीय हवामान खात्याने मंगळवारी सांगितले, संपूर्ण हंगामात एल निनो परिस्थितीची शक्यता मात्र फेटाळून लावली. भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी मान्सून पावसामुळे होणारी एल निनो परिस्थिती यावेळी विकसित होण्याची शक्यता कमी आहे, असे ते म्हणाले. देशाच्या काही भागात आधीच तीव्र उष्णतेची लाट आहे. एप्रिल ते जून या कालावधीत आणखी उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो आणि पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मोसमी पाऊस अतिशय महत्त्वाचा आहे, जो सुमारे ४२.३ टक्के लोकसंख्येच्या उपजीविकेला आधार देतो आणि देशाच्या जीडीपीमध्ये १८.२ टक्के योगदान देतो. एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ५२ टक्के क्षेत्र प्राथमिक पाऊस प्रणालीवर अवलंबून आहे. देशभरातील वीज निर्मितीव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या जलाशयांच्या पुनर्भरणासाठी देखील हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात सामान्य पावसाचा अंदाज देशासाठी मोठा दिलासा देणारा आहे. पावसाळ्याच्या दिवसाची संख्या कमी होत आहे आणि मुसळधार पावसाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येत आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.