गोंदिया : बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही. समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा बिरसी विमानतळावर धडकलेल्या १०६ कुटुंबातील प्रकल्पग्रस्तांनी दिला. सोमवारी (ता. ११) गावातून विमानतळाच्या गेटपर्यंत मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिक्रमण आणि अन्य काही कारणे सांगून शासन व विमानतळ प्रशासनाने काही वर्षांपूर्वी १०६ जणांची घरे तोडली. या सर्व कुटुंबाचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. परंतु, अद्यापही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. इतकेच नव्हे, अनेक समस्या कायम असताना आश्वासनापलिकडे कुठलाही तोडगा काढला जात नाही. याबाबत अनेकदा विमानतळ प्रशासनाला निवेदनही देण्यात आले

हेही वाचा >>>समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना येथे मिळणार नि:शुल्क उपचार; जाणून घ्या योजनेबद्दल

दरम्यान, शासन, प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करत सोमवारी बिरसीवासींनी गावातून थेट विमानतळाच्या गेटपर्यंत मोर्चा काढला. निदेशकांच्या नावे निवेदन दिले. येत्या काही दिवसांत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मोठे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही बिरसीवासींनी दिला. मोर्चात बिरसी गावातील प्रेमलाल तावाडे, अनंतराम डोये, गजानन तावाडे, दुलीचंद तावाडे, क्रिष्णा राय, मन्साराम मेंढे, जयेंद्र वंजारी, सुकलसिंह नैकाने यांच्यासह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 106 families protested at birsi airport regarding the rehabilitation of birsi airport project victims sar 75 amy