अनिल कांबळे, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात महिला व तरुणींची सुरक्षा धोक्यात आली असून गेल्या पाच वर्षांत तब्बल १ हजार ९३ बलात्काराच्या घटनांची नोंद आहे. पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>> पत्नीचा छळ करणाऱ्या संगणक अभियंत्याला कारावास

गेल्या पाच वर्षांतील महिलांवरील लैंगिक अत्याचाच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुली, तरूणी आणि विवाहित महिलांवर १०९३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यातही गतवर्षी सर्वाधिक २५२ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद पोलीस विभागाने घेतली आहे. यासोबतच शहरात अश्लील चाळे, शेरेबाजी, लज्जास्पद वर्तन आणि विनयभंगाच्याही घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १८३ महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल होते तर पाच वर्षांत ३१ टक्के गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. शासनाने महिलांना सुरक्षा आणि संरक्षण देण्यासाठी विविध प्रभावी कायदे केले आहेत. मात्र, पोलीस विभागाकडून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. पोलिसांकडून दोषींना शिक्षा होण्याइतपत तपास गांभीर्याने केला जात नाही. पोलिसांच्या तपासात अनेक त्रृटी असतात, त्याचा लाभ आरोपींना मिळतो. अनेकदा खटले प्रलंबित राहत असल्यानेही गंभीर स्वरुपाचे गुन्हे असताना आरोपींमध्ये वचक राहत नाही. पोलीस अधिकारी नेहमी नकारात्मक भूमिका घेत असल्यामुळे अनेक महिलांच्या तक्रारींमध्ये गुन्हा दाखल होत नाही. लैंगिक अत्याचारग्रस्त तक्रारदार महिलांसोबत पोलीस ठाण्यात कर्मचारी योग्य वागणूक देत नाहीत, त्याचाही परिणाम गुन्हे दाखल होण्यावर पडतो. राज्य महिला आयोग किंवा वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतरच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास गांभीर्य दाखविण्यात येत असल्याचे चित्र असते.

हेही वाचा >>> नववर्ष प्रारंभीच थोरल्याने केली धाकट्याची हत्या

महिलांवरील लैंगिक अत्याचार किंवा अन्य प्रकारच्या तक्रारींना नागपूर पोलीस गांभीर्याने घेतात. महिलांना न्याय मिळावा यासाठी पोलीस कटीबद्ध आहेत. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, लग्नाचे आमिष आणि प्रेमप्रकरणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.

वर्ष   बलात्काराचे गुन्हे

२०१९ – १८३

२०२०  – १७२

२०२१  – २३४

२०२२  – २५०

२०२३ – २५२

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1093 women rape in nagpur in last five years adk 83 zws
Show comments