नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान पुन्हा एकदा गंभीर प्रकार आढळून आला आहे. दहावीचा इंग्रजीचा पेपर चक्क परीक्षा केंद्रातून मोबाईलवर फोटो काढून व्हायरल करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरजवळच्या एका केंद्रावर घडला. या प्रकरणातील आरोपी पसार असून केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई केली जात आहे.

शनिवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. सकाळी ११ वाजता हा पेपर सुरू झाला. विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेपर सुरू झाल्यानंतर ११.३० वाजताच्या सुमारास संबंधित केंद्रातील एक कर्मचारी पेपरचे फोटो काढताना आढळला. ही माहिती बाेर्डाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्या भागातील भरारी पथकाला माहिती देण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांचे भरारी पथक १० मिनिटात बारवा येथील केंद्रावर पाेहचले. हा प्रकार खरा असल्याचे पथकाच्या लक्षात आले. यादरम्यान पेपरचे फोटो काढून व्हायरल करण्याचा प्रयत्न करणारा आराेप कर्मचारी केंद्रावरून पसार झाला हाेता. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता सीतारा बारवाच्या केंद्राचे केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि पसार कर्मचाऱ्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीतारा बारवा येथे जिल्हा परिषद आणि महात्मा ज्याेतिबा फुले शाळेत परीक्षेचे केंद्र आहेत. त्या दाेन्ही केंद्राचे कर्मचारी प्रकरणात सहभागी आहेत काय, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काेण-काेण सहभागी आहेत, त्यांचा शाेध घेण्यात येत असल्याची माहिती वंजारी यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात दोन कॉपी प्रकरणे

शनिवारच्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्येही दाेन काॅपी बहाद्दरांना पकडण्यात आले. ही दाेन्ही प्रकरणे चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील केंद्रावरील आहेत. याप्रकरणी संबंधित केंद्राचे केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी दिली.

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला ‘कॉपी’साठी मूकसंमती

इयत्ता १० वीच्या परीक्षेत इंग्रजी पेपरदरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे ‘कॉपी’ सुरू असल्याचा प्रकार शनिवारी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात उघडकीस आला. येथे शिक्षकाच्या मूकसंमतीने विद्यार्थी ‘कॉपी’ करीत असल्याचे उघडकीस आले, या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करावी, असा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या निर्देशानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी अपुर्वा बासूर नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात धडकल्या.

येथील वर्गखोली क्र. २ मध्ये पाहणी करीत असताना शिक्षक दीपक मुरलीधर तुराणकर हे विद्यार्थ्यांजवळ असलेल्या ‘कॉपी’ गोळा करीत असल्याचे दिसून आले. शिक्षक तुराणकर यांनी कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना ‘कॉपी’ करण्याची मूकसंमती दिल्याचे निदर्शनास आले. तसेच शाळेतील इतर वर्गखोळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात ‘कॉपी’ सुरू असल्याचे आढळून आले. या परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात येणार असून पुढील वर्षापासून गोपाळराव वानखेडे विद्यालय हे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव माध्यमिक बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच कॉपी करताना आढळून आलेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकरणे नोंद करून बोर्डाकडे वेगळी पाठविण्यात आली आहे. ‘कॉपी’ करण्यासाठी मदत करणारे शिक्षक दीपक तुराणकर यांच्याबाबतचा अहवाल बोर्डाकडे पाठवला जाईल. बोर्डाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे यांनी सांगितले.

Story img Loader