चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील पाचगाव येथील आशिष नन्नावरे या विद्यार्थ्यांची सामाजिक शिक्षणात देशातील नामांकित असलेल्या मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) या संस्थेमध्ये निवड झालेली आहे.
तिथे तो डिझास्टर मॅनेजमेंट या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. कालच घोषित झालेल्या निकालामध्ये आशिषला प्रवेशपत्र प्राप्त झालेले आहे. त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील लोकांनी चक्क ढोल ताश्याच्या गजरात त्याची मिरवणूक काढली आणि आशिषच्या आनंदात कुटुंबासोबतच शेकडो गावकरी सुद्धा सहभागी झाले. यावेळी संपूर्ण गावाच्या वतीने आशिषचा आणि आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा >>> नागपूर : अंगी कौशल्य, पण रोजगारासाठी पायपीट; देशात रोजगाराचे प्रमाण ६० टक्के
आशिषचे आई-वडील निर्मला व संतोष नन्नावरे शेती करतात. आशिषचे प्राथमिक शिक्षण गावीच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले असून १० वी व १२ वी चे शिक्षण वरोरा येथे पूर्ण झाले. १० व्या वर्गात नापास झालेल्या आशिषने पदवीचे शिक्षण सोशल वर्क या विषयात नागपूर येथे पूर्ण केले आणि स्वतःच करिअर घडवण्याचा एक वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर त्याने टीसमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली.
हेही वाचा >>> नागपुरात उष्माघाताचे तीन बळी? शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
प्रवेश परीक्षा पास केल्यानंतर त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. या परीक्षेची काठीण्य पातळी पार करून आशिषने स्वतःच्या मेहनतीने हे यश संपादन केलेले आहे. या विषयात देशभरातून फक्त ३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. सत्कार समारंभाला उत्तर देताना आशिषने आपले मनोगत व्यक्त करून संपूर्ण गावकऱ्यांचे आभार मानले. आशिष शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध सामाजिक चळवळीमध्ये काम करत असल्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्याला सामाजिक क्षेत्रामध्येच करिअर करायचे आहे आणि नामांकित शिक्षण संस्थांमध्ये वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी तो प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त करून दाखवला. स्वतःचे करिअर निवडण्याचा पारंपारिक मार्ग न शोधता एक वेगळा पर्याय निवडून त्यात त्याने यश संपादन केलेले आहे. त्यांने या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, शिक्षकवृंद आणि मित्रपरिवाराला दिले आहे.