लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरळीत सुरू असली तरी एका प्रश्नपत्रिकेतील चकीवरून वाद उठला आहे. विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत विज्ञान एक या विषयाचा पेपर अठरा मार्च रोजी झाला होता. त्यात सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत आपल्याकडे चिंता व्यक्त केल्याचं आमदार कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता या प्रश्नाचं अचूक उत्तर ‘हायड्रोजन’ हे आहे. पण काही शाळांमध्ये या प्रश्नाचं उत्तर ‘हेलियम’, तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा- ‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले

कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, “हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य ५३ पीएम आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य ३१ पीएम आहे; कारण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. हायड्रोजन हा द्वि-आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक-अण्वीय वायू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही. दोन्ही अणूंची ‘बॅन दे वॉल्झ’ त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही १२० पीएम आहे तर हेलिअम अणूची वॅन दे वॉल्झ त्रिज्या ही १४० पीएम आहे.

या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे ? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तरी कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान १ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th students will get extra marks what is the reason dag 87 mrj